आजही स्फूर्ती देणारा झंझावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 03:52 AM2017-11-19T03:52:53+5:302017-11-19T07:17:07+5:30
आणीबाणीतील इंदिरा गांधींचे सहकारीही आता या हल्ल्यात सामील झाले होते. या देशात इतका बीभत्स हल्ला यापूर्वी कोणावरही, कधीही झाला नव्हता. पण... त्या इंदिरा गांधीच होत्या.
- कुमार केतकर
(ज्येष्ठ पत्रकार)
२0 मार्च १९७७ रोजी निकाल जाहीर झाले. इंदिरा गांधींचा पराभव झाला. असंतोषाच्या, वाढत्या अपेक्षांच्या धगधगत्या ज्वालामुखीने त्यांना पोटात घेतले होते. टीकेच्या तोफांच्या तोंडी इंदिरा गांधी हे एकमेव नाव होते. पण एवढे होऊनही राजकारणाच्या केंद्रस्थानी इंदिरा गांधीच होत्या. काही सरकारी कचे-यांतून इंदिरा गांधींचे फोटो रस्त्यावर आणून फोडल्याचे वृत्त प्रसिद्ध होत होते. आणीबाणीतील इंदिरा गांधींचे सहकारीही आता या हल्ल्यात सामील झाले होते. या देशात इतका बीभत्स हल्ला यापूर्वी कोणावरही, कधीही झाला नव्हता. पण... त्या इंदिरा गांधीच होत्या. पुन्हा उभ्या राहिल्या. जिंकल्याही अन् मनामनात तेच स्थान निर्माणही केले. झंझावातातील हे चैतन्य आजही लोकांना स्फूर्ती देते!
इंदिरा गांधींनी १८ जानेवारी १९७७ रोजी अनपेक्षितपणे सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली आणि वातावरण एकदम फुलून आले. आणीबाणीच्या काळात अटकेत गेलेले पुढारी सुटले आणि काँग्रेसमधील असंतोषही प्रगट झाला. जगजीवनराम, नंदिनी सतपथी आणि बहुगुणा हे पक्षातून बाहेर पडले. तोपर्यंत जनता पक्षाची जुळवाजुळव पूर्ण होत आली होती. जगजीवनरामांनी ‘काँग्रेस फॉर डेमोक्रसी’ हा पक्ष स्थापन केला आणि तो जनता पक्षाच्या आघाडीत सामील झाला. पण निवडणुकीचे निकाल काय लागतील हा संभ्रमच होता. २0 मार्च १९७७ रोजी निकाल जाहीर झाले.
इंदिरा गांधींचा पराभव झाला. ती विलक्षण थक्क करून टाकणारी घटना होती. इंदिरा गांधींनी स्वत: पूर्वी बोलून दाखविल्याप्रमाणे; असंतोषाच्या, वाढत्या अपेक्षांच्या धगधगत्या ज्वालामुखीने त्यांना पोटात घेतले होते.
महिना-दोन महिन्यांतच इंदिराविरोधी वाङ्मयाचं एक पीकच देशात आलं. ‘इंदिरा गांधींचा उदय व ºहास’, ‘इंदिरा पर्व संपले’, ‘एकाधिकारशाहीचा अंत’ अशी पुस्तके प्रसिद्ध होऊ लागली. आणीबाणीच्या ‘न समजलेल्या’ घटनांनी वृत्तपत्रांचे रकाने भरले जाऊ लागले. ‘इंदिरा गांधी राजीनामा देणार नाहीत, लष्करी राजवट पुकारतील’ किंवा ‘सांताक्रुझला जे विमान सज्ज आहे, त्यातून पळून जातील’ किंवा ‘आत्महत्या करतील’ अशा वावड्या दोन महिने छापून येत. त्या कथा विश्वासार्ह वाटाव्या, म्हणून इंदिरा, संजय, मेनका यांचे पासपोर्टही रद्द करण्यात आले. ‘असा गुन्हेगार पळून जाणार नाही’, याची खबरदारी म्हणून, जेठमलानी, सुब्रह्मण्यम स्वामी, जॉर्ज फर्नांडिस गृह खात्याला खास उपाय योजायला सांगत होते.
जनता पक्ष राज्यावर होता, पण राजकारणाच्या केंद्रस्थानी इंदिरा गांधीच होत्या. काही सरकारी कचेºयांतून इंदिरा गांधींचे फोटो रस्त्यावर आणून फोडल्याचे वृत्त प्रसिद्ध होत होते. इंदिरा गांधींचे सहकारीही या हल्ल्यात सामील झाले होते. या देशात इतका बीभत्स हल्ला यापूर्वी कोणावरही झाला नव्हता. ज्या अर्थी बड्या बड्या पुढाºयांना त्यांची भीती वाटत होती त्या अर्थी इंदिरा गांधी संपलेल्या नाहीत, त्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा उड्डाण करणार, हा माझा विश्वास बळावू लागला, आणि मी इंदिरा फिर्नोमिनचा शोध घेऊ लागलो. मी इंदिरा गांधींबद्दलच्या भावनांचा शोध घ्यायचा ठरवले.
एक दिवस तडक उठलो, आॅफिसात रजेचा अर्ज टाकला. दिल्लीला गेलो. पण इंदिरा गांधी काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकांखरीज बाहेर पडत नाहीत, हे कळलं. भेटणाºयांबरोबर नमस्कार-चमत्कारापलीकडे बोलत नाहीत. मुलाखती देत नाहीत. पत्रकार परिषदा, जाहीर सभा, भाषणे दूरच राहिली.
इंदिरा गांधींचे १९६८-७१ काळातले सर्वात विश्वासू, खासगी चिटणीस, नेहरूंचे सहकारी, आणीबाणीतही इंदिरा गांधींच्या परिवारात राहिलेले एक विद्वान पी.एन. हक्सर यांनी भेट द्यायचे कबूल केले. मग रोमेश थापर, निखिल चक्रवर्ती, पी.एन. धर, हरिभाऊ गोखले, शारदाप्रसाद, खास चिटणीस शेषन्, बॅरिस्टर गाडगीळ, इंदिरा गांधींच्या निकटचे पत्रकार, अनेक जणांच्या दीर्घ मुलाखती घेतल्या.
पण इंदिरा गांधींना किमान १५ मिनिटे भेटल्याशिवाय दिल्ली सोडायची नाही, या निर्धाराने मी ठिय्या देऊन होतो. एक दिवस मला सकाळची वेळ मिळाली. मित्र शेखर साठे व मी जवळजवळ वीस मिनिटे त्यांच्याशी बोलत होतो.
त्यांना भेटायला येणाºया लोकांची रीघ कमी झालेली नव्हती. राज्याराज्यांतून लोक येत. त्यांच्याबरोबर फोटो काढीत. काही चक्क त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करीत. काही रडतसुद्धा. ‘आप कहाँसे आये हैं? ‘क्या करते हैं?’ इतपत संवाद संपला, की दुसरा गट.
इंदिरा गांधींना पक्षांतर्गतच प्रखर विरोध होता. वातावरण असे गोंधळाचे आणि द्वेषाचे असताना एक घटना घडली. त्या घटनेने देशातील राजकारणात आणि इंदिरा गांधींच्या जीवनाला एकच कलाटणी मिळाली.
बेल्ची या बिहारमधील एका खेड्यात हरिजन शेतमजुरांवर जमीनदारांनी सशस्त्र हल्ला केला. झोपड्या जाळून टाकल्या. काही हरिजनांना ठार मारले. बेल्ची हे खेडे कोणी दखल घेणार नाही इतके लहान. त्याकडे जाणारा रस्ता इतका चिखलमय असतो, की कोणतेही वाहन घेऊन बेल्चीला जाता येत नाही. बैलगाड्या, जीप, चिखलात रूतून बसतात. बेल्चीला जाण्याच्या वाटेवर महत्त्वाची शहरे, ठिकाणही नाही. बेल्चीला चार-दोन बडे जमीनदार आणि बाकी सगळे शेतमजूर. बेल्चीची जमीन बºयापैकी सुपीक. मुख्य पीक तांदळाचे. एकदा मजुरी कमी मिळाली म्हणून शेतमजुरांनी पीक कापूनही नेले होते. या ‘चोरीने’ खवळून जाऊन जमीनदार शेतमजुरांच्या घरात घुसला आणि मजुरांना बांधून त्याने फरफटत रस्त्यावर आणले - त्या दिवसापासून बेल्चीतले वातावरण तंग होते.
२७ मे च्या सकाळी काही सशस्त्र मंडळींनी शेतमजुरांच्या घरांना घेरले. या मंडळींशी मजुरांनी काही काळ सामना दिला; पण थोड्या अवधीत त्यांच्या लक्षात आले की त्यांना टिकाव धरता येणार नाही. त्यांनी भराभरा घरात जाऊन दरवाजे आतून बंद करून घेतले, लहान मुले, बायका आता विलक्षण भेदरली होती.
दादा मंडळी दरवाजे फोडून आत घुसली. बारा शेतमजुरांना बाहेर खेचून काढले, त्यांचे हात बांधले आणि फरफटत शेतावर आणले. त्यांनी मजुरांच्या अंगावर गोवºया थापल्या, केरोसिन ओतले आणि आग लावून दिली. किंकाळ्यांनी परिसर भेदरून उठला. मुलं-बाया सैरावैरा धावत होत्या. जमीनदारांच्या दादांनी इतस्तत: गोळीबार केला. हाती सापडलेल्या लोकांचे हातपाय तोडून त्यांना या अग्नीमध्ये फेकण्यात आले.
बेल्ची हत्याकांडाने उभा देश थरारला.
काँग्रेसच्या बैठकीत या हत्याकांडाचा निषेध करण्यात आला. इंदिरा गांधी म्हणाल्या, ‘आपल्या पक्षाच्या नेत्यांनी ताबडतोब बेल्चीला भेट द्यायला पाहिजे. तेथील हरिजनांचे निदान अश्रू पुसायला हवेत.’ एक दिवस उलटल्यावर पक्षपुढाºयांच्या आदेशाची वाट न पाहता इंदिरा गांधी दिल्लीहून सरळ बेल्चीला गेल्या. जवळच्या तालुक्यापर्यंत त्या जीपने गेल्या. पुढे पावसामुळे गुडघागुडघा चिखल झाला होता. दौरा रद्द करावा, असे पक्ष कार्यकर्त्यांनी सुचविले. इंदिरा म्हणाल्या, ‘येथील लोक जसे जातात, तशी मी जायला तयार आहे. मी दौरा रद्द करणार नाही.’ त्या दलदलीतून चालू लागल्या. पण असे चालत फारच वेळ लागणार होता. पक्षपुढाºयांनी धावतपळत जवळच्या गावातून पाळलेला हत्ती मिळवला. इंदिरा गांधी बेल्चीला हत्तीवरून गेल्या, म्हणून तेव्हा बरीच टिंगलटवाळी झाली. ‘संडे’ साप्ताहिकाच्या पत्रकाराने लिहिले, ‘हत्तीवरून जाण्याखेरीज दुसरा मार्गच नव्हता... बेल्चीतील भीषण वर्गसंघर्षापेक्षा या हत्तीवरून निघालेल्या इंदिरा गांधींच्या दौºयाविषयी अधिक आकर्षण होते.’
पण बेल्चीने इंदिरा गांधींच्या राजकीय व्यवहाराची दिशा स्पष्ट केली. तेव्हा ज्या त्या रस्त्यावर उतरल्या, त्यानंतर त्यांनी माघार घेतली नाही. आणीबाणीमुळे व आणीबाणीनंतर तुटलेला संवाद पुन्हा सुरू झाला होता.
एका पत्रकाराने विचारले, ‘तुम्ही परत राजकारणात येणार काय?’
या प्रश्नाला इंदिरा गांधींनी उत्तर दिले होते, ‘मी राजकारणातून बाहेर कधी गेले होते?’
हे वर्ष इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष आहे. १९ नोव्हेंबर १९१७ रोजी जन्माला आलेले ते झंझावाती आयुष्य या हत्येने संपले, पण त्या झंझावातातील चैतन्य आजही लोकांना स्फूर्ती देते!
(‘ज्वालामुखीच्या तोंडावर’ या पुस्तकाच्या आधारे. जन्मशताब्दीच्या निमित्ताने या पुस्तकाची चौथी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.)