संसदेचे आजपासून ‘वादळी’ अधिवेशन
By admin | Published: July 16, 2017 11:36 PM2017-07-16T23:36:37+5:302017-07-16T23:36:37+5:30
संसदेचे सोमवारपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. झुंडशाहीने केल्या जाणाऱ्या हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : संसदेचे सोमवारपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. झुंडशाहीने केल्या जाणाऱ्या हत्या, काश्मीर, सिक्किममधील तणाव, शेतकऱ्यांचे आंदोलन, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कथित भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन होत असलेली कारवाई या मुद्यावरुन विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.
संसदेच्या दोन्ही सभागृहात काही विद्यमान सदस्यांच्या निधनामुळे श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्यानंतर आज लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात येईल. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कॉंगे्रसने स्पष्ट केले की, चीनसोबतचा सिमा वाद, काश्मीरातील तणाव, गोरक्षकांचा हिंसाचार यावरुन सरकारला जाब विचारण्यात येणार आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, सिक्किममध्ये चीनमुळे तणाव निर्माण झाला आहे. त्यासाठी त्यांनी चीनला जबाबदार ठरविले. सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आझाद म्हणाले की, ही परिस्थिती चीनने निर्माण केली आहे. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि आम्ही तो संसदेत मांडू. तृणमूलने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता.
आझाद म्हणाले की, सरकारने चर्चेचे सर्व मार्ग बंद केले आहेत. काश्मीरात राजकीय घुसमट होत आहे. सभागृहाच्या कामकाजात काँग्रेस विघ्न आणणार नाही. पण, सरकारने विविध मुद्यांवर चर्चेसाठी पुढे यावे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे.