आधी शौचालय, मग देवालय! मोदी यांचा मंत्र, देश स्वच्छ ठेवणाºयांनाच वंदे मातरम्चा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 04:02 AM2017-09-12T04:02:02+5:302017-09-12T04:02:27+5:30
‘भारतात आधी शौचालय, मग देवालय’ हा विचार रुजायला पाहिजे, असे स्पष्ट करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पान खाऊन आजूबाजूला थुंकणा-या लोकांना सोमवारी चांगलेच फटकारले. अशा लोकांना नव्हे, तर देश स्वच्छ ठेवणा-या सफाई कामगारांनाच या देशात वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘भारतात आधी शौचालय, मग देवालय’ हा विचार रुजायला पाहिजे, असे स्पष्ट करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पान खाऊन आजूबाजूला थुंकणा-या लोकांना सोमवारी चांगलेच फटकारले. अशा लोकांना नव्हे, तर देश स्वच्छ ठेवणा-या सफाई कामगारांनाच या देशात वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार आहे. देश स्वच्छ ठेवणारेच लोक खºया अर्थाने भारतमातेचे सुपुत्र आहेत, असेही त्यांनी बोलून दाखविले.
स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोमधील भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व पं. दीनदयाळ उपाध्याय शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात मोदी म्हणाले की, इथे प्रवेश करताच मला वंदे मातरमच्या घोषणा ऐकू आल्या.
पण देशवासीयांना मी विचारू इच्छितो की, आपणास वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार आहे का?
माझे बोलणे जिव्हारी लागेल. पान खाऊन भारतमातेवर पिचकारी मारतो आणि नंतर वंदे मातरम् म्हणतो, हे
योग्य आहे का?
एकविसाव्या शतकातील भारत उभा करण्यासाठी सज्ज राहा, महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू, आझाद, विवेकानंद, सुभाषचंद्र बोस यांच्या स्वप्नातील भारत साकार करण्यासाठी तयार राहा.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
ममता, शहा यांची आदरांजली
कोलकाता : विवेकानंद यांच्या शिकागोतील भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वामी विवेकानंदांना सोमवारी आदरांजली अर्पण केली. अमित शहा यांनी सोमवारी विवेकानंद यांच्या घरी भेट देत त्यांना आदरांजली अर्पण केली.
गंगेच्या स्वच्छतेबाबत विचार करतो का?
मोदी म्हणाले की, गंगेत डुबकी मारल्याने पापे धुतली जातात, असा समज आहे. आपल्या पालकांना गंगास्नान घडवावे, असे अनेक जण विचार करतात. पण गंगेच्या स्वच्छतेबाबत कोणी विचार करतो का? स्वामी विवेकानंद आज जिवंत असते, तर त्यांना हे खचितच आवडले नसते. मोठी रुग्णालये व डॉक्टर्स यांच्यामुळे आपण निरोगी राहतो. पण सफाई कामगार देश स्वच्छ ठेवतात, याचाही विचार व्हायला हवा. धर्म व परंपरांचा पगडा असलेल्या देशातून आलेल्या स्वामी विवेकानंदांनी समाजातील अनिष्ट प्रथांवर कोरडे ओढायलाही कमी केले नाही, याची आठवण मोदींनी करून दिली. स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनात गुरू शोधण्याऐवजी सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.