देशविरोधी कारवायांसाठी टिकटॉक, हेलोचा वापर?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 04:32 AM2019-07-19T04:32:58+5:302019-07-19T04:33:08+5:30
भारतामध्ये देशविरोधी कारवायांसाठी टिकटॉक, हेलो यांचा वापर केला जात आहे, अशी तक्रार आल्यानंतर केंद्र सरकारने या चिनी बनावटीच्या सोशल मीडिया अॅपना २४ प्रश्नांच्या यादीसह नोटिसा बजावल्या आहेत.
नवी दिल्ली : भारतामध्ये देशविरोधी कारवायांसाठी टिकटॉक, हेलो यांचा वापर केला जात आहे, अशी तक्रार आल्यानंतर केंद्र सरकारने या चिनी बनावटीच्या सोशल मीडिया अॅपना २४ प्रश्नांच्या यादीसह नोटिसा बजावल्या आहेत. या प्रश्नांची २२ जुलैपर्यंत समाधानकारक उत्तरे न दिल्यास दोन्ही अॅपवर बंदीही घातली जाऊ शकते असा इशाराही सरकारने दिला आहे. या अॅपचा वापर देशविरोधी कारवाया व बेकायदेशीर कृत्यांसाठी केला जात असल्याची तक्रार रा. स्व. संघाशी संलग्न स्वदेशी जागरण मंचने केंद्र सरकारकडे केली होती. त्यावर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही पावले उचलली आहेत.
यासंदर्भात टिकटॉक व हेलोने एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, भारत आमच्या मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. तेथील सरकारने आखलेले नियम व अटींचे पालन करण्यासाठी आम्ही संपूर्ण सहकार्य करू. मॉर्फ केलेल्या ११ हजार राजकीय जाहिराती इतर समाजमाध्यमांमध्ये झळकविण्यासाठी हेलोने मोठी रक्कम अदा केल्याचा आरोप आहे. भारतात एखादी व्यक्ती १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कायद्याने प्रौढ ठरते. असे असूनही टिकटॉक, हेलो वापरण्यासाठी १३ वर्षे वय पूर्ण असण्याची पात्रता का ठरविण्यात आली असाही सवाल सरकारने विचारला आहे. टिकटॉक, हेलो ही अॅप चीनमधील बाइटडान्स या कंपनीच्या मालकीची आहेत.
>भारतीयांची माहिती अन्य देशांना देऊ नका
भारतीय नागरिकांची जमा झालेली माहिती अन्य कोणत्याही देशाला किंवा खाजगी कंपनी, संस्थेला देणार नाही, अशी हमी टिकटॉक, हेलो यांच्याकडून केंद्र सरकारने मागितली आहे. हे दोन्ही अॅप देशविरोधी कारवायांचे आगर बनल्याच्या तक्रारीबद्दल त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. अफवा, खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी टिकटॉक, हेलोने काय उपायोजना केल्या आहेत याची विचारणाही केंद्र सरकारने पाठविलेल्या नोटीसमध्ये केली आहे.