दरवर्षी ₹400 कोटींची कमाई; या टोलनाक्याने सरकारची तिजोरी भरली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 22:10 IST2025-03-24T22:07:14+5:302025-03-24T22:10:14+5:30
Toll Tax: कोणत्या राज्यात आहे देशातील सर्वाधिक कमाई करणारा टोलनाका? पाहा...

दरवर्षी ₹400 कोटींची कमाई; या टोलनाक्याने सरकारची तिजोरी भरली...
Toll Plaza: भारतात गेल्या काही वर्षांपासून महामार्गाचे जाळे वेगाने पसरत आहे. पण, याच हायवे-एक्स्प्रेस-वेवरुन प्रवास करताना प्रत्येकाला टोल प्लाझावर थांबून टोल टॅक्स भरावा लागतो. टोल टॅक्समुळे तुमचा खिसा कापला जात असला तरी, सरकारी तिजोरी भरते. या टोल टॅक्समुळे सरकारी तिजोरीत प्रचंड पैसा येतो. पण तुम्हाला माहीत आहे का, देशातील सर्वात कमाई करणारा टोल प्लाझा कोणता आहे आणि त्याची कमाई इतकी आहे?
देशातील सर्वात फायदेशीर टोल प्लाझा
देशातील सर्वाधिक कमाई करणारा टोल प्लाझा गुजरातच्या भरठाणा गावात आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर बांधलेला हा टोल प्लाझा कमाईच्या बाबतीत अव्वल आहे. राजधानी दिल्लीला मुंबईशी जोडणाऱ्या या महामार्गावर बनवण्यात आलेला हा टोल प्लाझा सर्वाधिक कमाई करणारा टोल प्लाझा म्हणून गणला जातो.
एका वर्षात किती उत्पन्न
गुजरातमधील NH-48 च्या वडोदरा-भरूच भागावरील भरठाणा टोल प्लाझा हा देशातील सर्वात फायदेशीर टोल प्लाझा आहे. या टोल प्लाझाने वर्षाला 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये, म्हणजे 2019-20 ते 2023-24 या काळात या टोल प्लाझाने 2,043.81 कोटी रुपयांचा टोल वसूल केला आहे.
टोल प्लाझाची कमाई वाढली
फास्टॅग लागू झाल्यापासून टोल प्लाझाची कमाई वाढली आहे. फास्टॅगच्या मदतीने टोल टॅक्स चोरी कमी झाली आहे. यामुळे महसूलदेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सरकारसाठी रोड टॅक्स हे कमाईचे मोठे साधन आहे. उत्तर भारतातील राज्यांमधून माल NH-48 द्वारे पश्चिम किनारपट्टीच्या बंदरांवर पोहोचतो. ट्रक आणि वाहनांना या टोलनाक्यावरून जावे लागते, त्यामुळे या टोलनाक्याचे उत्पन्न अधिक असते, तर खासगी वाहनांच्या तुलनेत व्यावसायिक वाहनांचा टोलही अधिक असतो.
याच HH-48 वर बांधलेला राजस्थानचा शाहजहांपूर टोल प्लाझा कमाईच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे दरवर्षी 378 कोटी रुपये टोलवसुली होते. याशिवाय पश्चिम बंगालचा जलधुलागोरी टोल प्लाझा कमाईत तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात बराजोर टोल प्लाझा चौथ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 97 टोलनाके आहेत.