शेतकऱ्यांचा नाद करायचा नाय! टोमॅटो विकून 45 दिवसांत केली 4 कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 03:40 PM2023-07-31T15:40:43+5:302023-07-31T15:41:29+5:30
Tomato Farmer Success Story: आंध्र प्रदेशातील एका शेतकऱ्याने टोमॅटो विकून 45 दिवसांत 4 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Tomato Farmer Success: मागील काही दिवसांपासून देशभरात टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सामान्य नागरिकांना याचा फटका बसत असला तरी, शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. टोमॅटो विकून देशातील अनेक शेतकरी मालामाल झाले आहेत. अशा शेतकऱ्यांच्या अनेक बातम्याही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. यातच आता आंध्र प्रदेशातील एका शेतकऱ्याने टोमॅटो विकून कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.
45 दिवसांत 4 कोटींची कमाई
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील 48 वर्षीय शेतकरी मुरली यांनी टोमॅटो विकून अवघ्या दीड महिन्यात 4 कोटींची कमाई केली आहे. मीडियाशी बोलताना मुरली म्हणाले की, ते गेल्या आठ वर्षांपासून टोमॅटोची शेतकरी करत आहेत, पण यापूर्वी त्यांना कधीच इतके पैसे मिळाले नाही. मुरली सांगतात की, टोमॅटोची विक्री करण्यासाठी ते 130 किमीचा प्रवास करत कोलारमध्ये जात आहेत. स्थानिक बाजारपेठेत त्यांना चांगला भाव मिळत नाहीये.
कुटुंबाला कर्जातून बाहेर काढले
चित्तूर जिल्ह्यातील करकमंडला गावाचे रहिवासी मुरली संयुक्त कुटुंबात राहतात. त्यांना वारसाहक्काने 12 एकर जमीन मिळाली होती, तर काही वर्षांपूर्वी त्यांनी आणखी 10 एकर जमीन खरेदी केली. गेल्या वर्षी जुलैमध्ये टोमॅटोचे भाव कोसळल्याने त्यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले होते. त्यांच्यावर दीड कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यांनी बियाणे, खते, मजुरी, वाहतूक आणि इतर गोष्टींवर हा खर्च केला होता.
या कर्जामुळे त्यांचे कुटुंब खूप मानसिक त्रासात होते. पण, यंदा टोमॅटोला चांगला भाव मिळाल्यामुळे त्यांचे नशीब पालटले. यावर्षीचे पीक दर्जेदार असून आतापर्यंत 35 पीकं काढणी झाल्याचे त्यांनी सांगितले. आणखी 15-20 पिके येण्याची अंदाज आहे. मुरली यांनी मिळालेल्या पैशातून सर्व कर्ज फेडल्यानंतरही त्यांच्याकडे 2 कोटी रुपये शिल्लक आहेत. मुरली यांचा मुलगा इंजिनीअरिंग तर मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे.