'लाल वादळा'ची धडकी! १४ टक्के लोकांनी टोमॅटो विकत घेणं केलं बंद अन् 46 टक्के लोकं...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 08:50 PM2023-07-15T20:50:20+5:302023-07-15T20:51:52+5:30

सर्व्हेक्षणात समोरी आली रंजक आकडेवारी, वाचा सविस्तर

tomato price rises survey says 14 percent people stopped buying tomatoes 46 percent paying over RS 150 per kg read in detail | 'लाल वादळा'ची धडकी! १४ टक्के लोकांनी टोमॅटो विकत घेणं केलं बंद अन् 46 टक्के लोकं...

'लाल वादळा'ची धडकी! १४ टक्के लोकांनी टोमॅटो विकत घेणं केलं बंद अन् 46 टक्के लोकं...

Tomato Prices: गेल्या तीन आठवड्यांत देशातील विविध शहरांमध्ये टोमॅटोच्या दरात अनेक पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. 'लोकलसर्कल'च्या सर्वेक्षणात टोमॅटोची खरेदी आणि वापर याबाबत एक रंजक आकडेवारी समोर आली आहे. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की 46 टक्के कुटुंबे आता टोमॅटोसाठी 150 रुपये किलोपेक्षा जास्त दर देत आहेत. तर 14 टक्के कुटुंबांनी टोमॅटो खरेदी करणेच बंद करून टाकले आहे. याशिवाय, 68 टक्के कुटुंबांनी टोमॅटोचा वापर कमी केला आहे.

टोमॅटोचे भाव अचानक वाढले

राजधानी दिल्लीत टोमॅटोचे भाव 24 जूनला 20-30 रुपये प्रति किलोवरून 180 रुपये किलो झाले. काही प्रकारचे किंवा चांगल्या दर्जाच्या टोमॅटोची किंमतही 220 रुपये किलोवर गेली. इतर शहरांमध्ये आणि तामिळनाडू आणि केरळसारख्या देशातील काही राज्यांमध्ये टोमॅटोचा भाव आजही 180 रुपये किलोपेक्षा जास्त आहे. टोमॅटोचे काही दर्जेदार प्रकार (top quality) तर त्याहूनही महागात विकले जात आहेत. 'देशी' टोमॅटोचे भाव काही शहरांमध्ये 180-250 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. तर संकरित (Hybrid) आणि हिरव्या रंगाच्या टोमॅटोचे दर स्वस्त आहेत. काही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर 150 ते 180 रुपये प्रति किलो या दराने संकरित आणि हिरव्या जातीचे टोमॅटो विकले जात आहेत.

ग्राहक व्यवहार विभागाने नॅशनल अँग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (ANCCF) यांना एकाच वेळी प्रमुख उपभोग केंद्रांवर वितरणासाठी टोमॅटोची खरेदी त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, मर्यादित उपलब्धता असूनही, शुक्रवारपासून (१४ जुलै) दिल्लीत टोमॅटो ९० रुपये किलोने विकायला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, लोकलसर्कल सर्वेक्षणाने भारतातील 342 जिल्ह्यांतील नागरिकांकडून 22,000 हून अधिक प्रतिसाद गोळा केले. यामध्ये 65 टक्के पुरुष आणि 35 टक्के महिला होत्या. 42% लोक हे टियर 1 मध्ये, 34% लोक हे टियर 2 मध्ये आणि 24% लोक हे टियर 3, 4 आणि ग्रामीण जिल्ह्यांतील होते. सर्वेक्षण केलेल्या 87% ग्राहकांनी सांगितले की ते त्यांच्या नवीन खरेदी दरम्यान टोमॅटोसाठी प्रति किलो 100 रुपये जास्त देत आहेत.

अनेकांनी टोमॅटो वापरणं केलं बंद

100 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त दर देणाऱ्या कुटुंबांची टक्केवारी 27 जून रोजी 18% वरून 14 जुलै रोजी 87% पर्यंत वाढली. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 68 टक्के कुटुंबांनी टोमॅटोचा वापर कमी केल्याचे सांगितले तर 14 टक्के कुटुंबांनी सध्या टोमॅटो विकत घेणेच बंद केले आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 14 टक्के कुटुंबांनी टोमॅटो खाणे बंद केल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. तर 35 टक्के लोकांनी वापरात लक्षणीय घट झाल्याचे सांगितले आहे. 33 टक्के लोकांनी ते अंशतः कमी केले आहे आणि केवळ 16 टक्के लोकांनी वापर सामान्य ठेवला आहे. काही लोकांनी टोमॅटो खरेदी करण्यासाठी अधिक पैसेही दिले आहेत.

Web Title: tomato price rises survey says 14 percent people stopped buying tomatoes 46 percent paying over RS 150 per kg read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.