Tomato Price : 'या' ठिकाणी टॉमेटो मिळतायत २३ रुपये किलो, तर पोर्ट ब्लेयरमध्ये सर्वात महाग १३५ रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 01:40 PM2021-11-25T13:40:10+5:302021-11-25T13:40:42+5:30
गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या किंमतीही वाढताना दिसत होत्या. अचानक टॉमेटोच्या किंमतींनीही शतक पार केल्याचं दिसून आलं होतं.
देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी उच्चांक गाठला होता. तर दुसरीकडे अशा परिस्थितीतही पोर्ट ब्लेयरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल मिळत होतं. परंतु आता भाजीपाल्याच्या वाढलेल्या दरांमध्ये मात्र पोर्ट ब्लेयरमध्ये टॉमेटोची किंमत ही सर्वाधिक १३५ रूपये प्रति किलोवर पोहोचली आहे. या ठिकाणी सध्या पेट्रोल ८२.९६ रूपये आणि डिझेल ७७.१३ रूपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.
ग्राहक मंत्रालयाच्या वेबसाईटवर दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार २४ नोव्हेंबर २०२१ रोजी सर्वात स्वस्त टोमॅटो जोधपूर आणि बोडेली येथे २३ रूपये प्रति किलो दरानं विकला जात होता. तर सर्वात महाग बटाटा ५१ रूपये प्रति किलो दरानं टीपुरम येथे आणि ११ रूपये प्रति किलो दरानं हमीरपुर येथे विकला जात होता. तर एक किलो कांद्याची किंमत सोहरा आणि सिलिगुडी येथे ६० रूपये आणि भोपाळमध्ये २० रूपये इतकी होती.
सध्या अनेक भाज्या सफरचंदांपेक्षा महाग विकल्या जात आहेत. हिवाळ्यात स्वस्तात विकल्या जाणाऱ्या वाटाणा आणि टोमॅटोचे भावही आता शिगेला पोहोचले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये हिवाळ्यात २०/२५ रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो अनेक ठिकाणी १०० रुपये किलोवर पोहोचला आहे. तर अनेक ठिकाणी १००, १५० आणि २०० रुपये किलोने वाटाणा विकला जात आहे.
का महाग होतोय भाजीपाला?
भाजीपाला महाग होण्यामागे अनेक कारणे आहेत. दक्षिण भारतामध्ये टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र यंदा अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक खराब झाल्याने दक्षिण भारतामधून येणाऱ्या टोमॅटोची आवक घटली. परिणामी दिल्लीसह देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत.