उद्या ‘ते’ बलात्कार, हत्येचेही करतील समर्थन, महिला सैनिकाला पाठिंबा देणाऱ्यांवर रणौत यांनी केली टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 06:20 AM2024-06-09T06:20:43+5:302024-06-09T06:21:02+5:30
Kangana Ranaut News: चंडीगड विमानतळावर भाजपच्या खासदार व अभिनेत्री कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफच्या महिला सैनिकाला पाठिंबा देणाऱ्यांवर रणौत यांनी कडक टीका केली आहे. अशा प्रकारांना पाठिंबा देणारे उद्या बलात्कार किंवा हत्या प्रकरणाचेही समर्थन करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली - चंडीगड विमानतळावर भाजपच्या खासदार व अभिनेत्री कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफच्या महिला सैनिकाला पाठिंबा देणाऱ्यांवर रणौत यांनी कडक टीका केली आहे. अशा प्रकारांना पाठिंबा देणारे उद्या बलात्कार किंवा हत्या प्रकरणाचेही समर्थन करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
रणौत यांनी गुरूवारी एक व्हिडीओ प्रसारित केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, कायदे धाब्यावर बसवून गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्यांना पाठिंबा देणारे उद्या बलात्कार, हत्या प्रकरणांचेही समर्थन करतील. गुन्हेगारांना समर्थन देण्याच्या मानसिकतेचा सर्वांनीच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. एखाद्याने दुसऱ्या व्यक्तीबद्दल कमालीचा आकस, द्वेष बाळगू नये, असे त्या म्हणाल्या.
मारहाणप्रकरणी रणौतच्या बाजूने अभिनेत्री शबाना आझमी यांनी मत मांडले आहे. कंगना राणौत यांच्याविषयी मला उमाळा किंवा प्रेम नाही. कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिला सैनिकाला पाठिंबा देणाऱ्यांची भूमिका चुकीची आहे. या भूमिकेशी मी सहमत नाही. सुरक्षा दलाच्या जवानांनीच कायदा हातात घेण्यास सुरूवात केली तर आपण कोणीही सुरक्षित राहाणार नाही.
निष्पक्ष चाैकशीची मागणी
चंडीगड : भाजपच्या खासदार कंगना रणौत यांना मारल्याप्रकरणी सीआयएसएफच्या महिला काॅन्स्टेबल कुलविंदर काैर यांच्या समर्थनार्थ पंजाब किसान काॅंग्रेस पुढे सरसावली आहे. पक्षाचे प्रमुख करणजीतसिंग यांनी याप्रकरणाची निष्पक्ष चाैकशी करण्याची मागणी
केली आहे.
सिंग यांनी सांगितले की, घटनेबाबत काेणतेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाही. तरीही गुन्हा कसा काय दाखल करण्यात आला? याप्रकरणाची निष्पक्ष चाैकशी झाली पाहिजे. हे प्रकरण संसदेत उचलून धरण्याचे आवाहनही त्यांनी पंजाबमधील नवनियुक्त खासदारांना केले.