जीभ सैल तरी खुर्ची सलामत!

By admin | Published: April 12, 2015 02:29 AM2015-04-12T02:29:19+5:302015-04-12T02:29:19+5:30

रोज नवी वादग्रस्त विधाने करून पक्ष आणि सरकारला अडचणीत आणण्याचा मोदी सरकारमधील काही मंत्री, भाजपा खासदार व नेत्यांनी जणू चंगच बांधला आहे.

The tongue is relaxed! | जीभ सैल तरी खुर्ची सलामत!

जीभ सैल तरी खुर्ची सलामत!

Next

वाचाळांना जाब कोण विचारणार? : सरकारची हाताची घडी...मोदींचे तोंडावर बोट!
रोज नवी वादग्रस्त विधाने करून पक्ष आणि सरकारला अडचणीत आणण्याचा मोदी सरकारमधील काही मंत्री, भाजपा खासदार व नेत्यांनी जणू चंगच बांधला आहे.
त्यांच्या कारनाम्यांना काही मर्यादाच राहिलेली नाही. विशेष म्हणजे या बोलघेवड्या नेत्यांच्या विधानांपासून स्वत:ला नामनिराळे करण्यापलीकडे सरकार वा भाजपाने कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही. कदाचित याचमुळे सरकार व पक्षाला अडचणीत आणणाऱ्या नेत्यांची बेमुर्वतखोर मुक्ताफळे अजूनही सुरू आहेत.
मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यासोबतच भाजपा नेते-मंत्री व खासदारांच्या वादग्रस्त विधांनाना सुरुवात झाली होती तेव्हापासून मोदी सरकारच्या गत साडेदहा महिन्यांच्या कार्यकाळात हा ‘सिलसिला’ तसाच कायम आहे. बोलभांड नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सरकार आणि पक्षावर अनेकदा नामुष्कीची वेळ ओढवली.
लष्करप्रमुख राहिलेले परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी अलीकडे थेट प्रसारमाध्यमांवरच गरळ ओकली. ‘पूर्वग्रहदूषित व पक्षपाती वागणाऱ्या ‘प्रेस्टिट्यूट’कडून (प्रसारमाध्यमे) तुम्ही काय अपेक्षा करणार’,असे टिष्ट्वट त्यांनी केले.
प्रेस्टिट्यूट हा शब्द प्रॉस्टिट्यूट (वेश्या) या शब्दात सुरुवातीचे अक्षर बदलून तयार केला आहे. त्यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर मी ‘प्रॉस्टिट्यूट’ नाही तर ‘प्रेस्टिट्यूट’ म्हटल्याचे सांगून त्यांनी सारवासारव चालवली आहे.
शब्दकोशात ‘प्रेस्टिट्यूट’ हा शब्दच नाही. याउपरही सिंह यांनी यापूर्वी अनेकदा या शब्दाचा वापर केलेला आहे. त्यांच्या या विधानाने भाजपाच नाही तर मोदी सरकारही अडचणीत आले. मात्र हे सिंह यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगून भाजपाने हात वर केले.

बोलभांड नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सरकार आणि पक्षावर अनेकदा नामुष्कीची वेळ ओढवली. मोदी सरकारच्या गत साडेदहा महिन्यांच्या कार्यकाळात हा ‘सिलसिला’ तसाच कायम आहे. पण या बेताल बोलणाऱ्या नेत्यांबाबत सरकारने मिठाची गुळणी धरली आहे.

बोलघेवड्या नेत्यांच्या विधानांपासून स्वत:ला नामनिराळे करण्यापलीकडे सरकार वा भाजपाने कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही. कदाचित याचमुळे सरकार व पक्षाला अडचणीत आणणाऱ्या नेत्यांची बेमुर्वतखोर मुक्ताफळे अजूनही सुरू आहेत.

राजीव गांधी यांनी नायजेरियन मुलीशी लग्न केले असते आणि सोनिया गांधी गौरवर्णीय नसत्या तर काँग्रेसने त्यांचे नेतृत्व स्वीकारले असते काय?
- गिरिराज सिंह

उन्हात बसू नका, काळ्या व्हाल आणि तसे झाले तर तुमची लग्ने होणार नाहीत, असा वादग्रस्त सल्ला गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी उपोषणाला बसलेल्या आंदोलक नर्सेसना दिला.

मतदानाआधी दहा दिवस लक्ष्मीदर्शनाचा योग आहे. याच काळात हरामाचा पैसा गरिबाच्या पदरात पडतो. म्हणून या लक्ष्मीला नाकारू नका, असा सल्ला भाजपा नेते नितीन गडकरींनी मतदारांना दिला होता.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, अशी मुक्ताफळे भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी उधळली होती, यावरून संसदेत एकच गदारोळ झाला.

राहुल गांधी हे दलितांच्या घरामध्ये पिकनिक आणि हनीमूनसाठी जातात, अशी अत्यंत खालच्या पातळीवरील टीका भाजपाचे कट्टर समर्थक व योगगुरू रामदेव बाबांनी
केली होती.

बोलभांड नेते उचलली जीभ लावली टाळ््याला या पद्धतीने वाटेल ते बोलत आहेत. त्यातून कुचंबणा होणारे केंद्र सरकारची हाताची कृतिशून्य घडी घालून आहे. तर स्वत: पंतप्रधान मोदी तोंडावर बोट ठेवून गप्प आहेत. बोलून बोलायचे तर कमी का, या राजकीय वगनाट्याचा प्रयोग त्यामुळेच तर वारंवार रंगतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना आपल्या नेत्यांना लक्ष्मणरेषा न ओलांडण्याबाबत व विचारपूर्वक बोलण्याची समज द्यावी लागली. पण समज देण्यापलीकडे आणि संबंधित वादग्रस्त विधानांपासून पक्ष व सरकारला नामानिराळे करण्यापलीकडे या नेत्यांवर कुठलीही ठोस कारवाई केली गेली नाही, हेही तेवढेच खरे!

तुम्हाला दिल्लीत रामाच्या पुत्रांची सत्ता हवी की अनौरसांची, हे तुम्हाला ठरवायचे आहे.
- साध्वी निलंजन ज्योती

मशीद हे धार्मिक स्थळ नाही. ते कधीही आणि कशासाठीही पाडता येते.
- सुब्रमण्यम स्वामी

भारतात राहणारे सर्व लोक हिंदू आहेत. मी स्वत: ख्रिश्चन हिंदू आहे.
- फ्रान्सिस डिसूझा, गोव्याचे उपमुख्यमंत्री

आयआयटीचे संचालक नेमण्याच्या अतर्क्य निवड पद्धतीला होकार देण्याच्या मनुष्यबळमंत्री स्मृती इराणी यांच्या कृतीने डॉ. अनिल काकोडकर आयआयटी नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या पद्धतीने न बोलता निर्णयातूनही दंश सुरू आहेत.

भाजपा खासदार योगी आदित्यनाथ आणि साक्षी महाराज यांनी अशीच प्रक्षोभक विधाने वेळोवेळी केली. मग पंतप्रधानांना सभागृहात येऊन आपल्या नेत्यांना मर्यादा न लांघण्याची समज द्यावी लागली. त्यानंतरही या नेत्यांची ‘सांप्रदायिक वक्तव्ये’ थांबली नाहीत. बलात्काराचा आरोप झेलणारे खासदार साक्षी महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नाथूराम गोडसे याला ‘देशभक्त’ संबोधून देशाचा रोष ओढवून घेतला.

‘पूर्वग्रहदूषित व पक्षपाती वागणाऱ्या ‘प्रेस्टिट्यूट’कडून (प्रसारमाध्यमे) तुम्ही काय अपेक्षा करणार’. मी ‘प्रॉस्टिट्यूट’ नाही तर ‘प्रेस्टिट्यूट’ म्हटले आहे.
- व्ही.के. सिंह , परराष्ट्र राज्यमंत्री


नेत्यांनी विचारपूर्वक बोलायला हवे. तसेच या संदर्भात लक्ष्मण रेषेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
- अमित शहा,
भाजपा अध्यक्ष

अगदी अलीकडे दिलीप गांधी आणि श्यामाचरण गुप्ता या दोन भाजपा खासदारांनी तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादनांची री ओढताना सरकारच्या संकटात भर टाकण्याचे प्रयत्न केले. तंबाखूने कर्करोग होतो, असा कुठलाही अभ्यास भारतात झाला नसल्याचे सांगून दिलीप गांधी यांनी खळबळ उडवून दिली. अलाहाबादेतील उद्योगपती आणि भाजपाचेच खासदार श्यामाचरण गुप्ता यांनीही बिडीमुळे कर्करोग होतो, याचे कुठलेही पुरावे नसल्याचे सांगितले.

वादग्रस्त विधाने करण्यात मोदी सरकारमधील राज्यमंत्री गिरीराज सिंह कदाचित आघाडीवर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळातच मोदींना विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, असे सांगून गिरीराज सिंह यांनी वाद निर्माण केला होता. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई करण्याऐवजी केंद्र सरकारमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्रिपद देऊन एकप्रकारे त्यांना ‘बक्षिसी’ देण्यात आली.
अगदी काही दिवसांपूर्वीच वादग्रस्त वक्तव्ये करण्याची खोड जडलेल्या गिरीराज सिंह यांनी थेट काँगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध वर्णद्वेषी वक्तव्य केले.
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री साध्वी निलंजन ज्योती यांनी तर हिंदूंनी कमीतकमी चार मुले जन्मास घालावी, असा आगाऊ सल्लाच दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचार रॅलीत दिला होता.

जयशंकर गुप्ता

Web Title: The tongue is relaxed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.