चिखलात अंघोळ करा अन् शंख वाजवा, कोरोना आसपासही फिरकणार नाही; भाजपा खासदाराचा 'अजब' दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 04:54 PM2020-08-16T16:54:21+5:302020-08-16T17:07:44+5:30
खासदारांचा हा सल्ला आता चर्चेचा विषय ठरला आहे.
टोंक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील अनेक देशांकडून लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, कोरोनाला पराभूत करण्यासाठी भाजपाचे अनेक नेते वेगवेगळे दावे करताना दिसत आहेत.
केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार अर्जुन मेघवाल यांनी भाभीजी पापड खाण्याचा सल्ला दिल्यानंतर आता कोरोना टाळण्यासाठी भाजपाच्या आणखी एका खासदाराने एक वेगळा सल्ला दिला आहे. चिखलात अंघोळ केल्याने आणि शंख वाजविल्यामुळे कोरोनापासून बचाव करता येईल, असा सल्ला या खासदारांनी दिला आहे. खासदारांचा हा सल्ला आता चर्चेचा विषय ठरला आहे.
राजस्थानमधील टोंक येथील भाजपा खासदार सुखबीरसिंह जौनपुरिया यांचा एक अजब व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते चिखलात अंघोळ करत शंख वाजवताना दिसत आहेत. तसेच, व्हिडिओमध्ये ते असेही म्हणत आहेत की, "कोरोना ज्या दिवशी सुरू झाला होता, त्या दिवशी मी आपल्याला प्रतिकारशक्ती वाढवण्यास सांगितले होते. ही औषधे खाल्ल्याने वाढणार नाही. आपल्याला नैसर्गिक मार्गाने प्रतिकारशक्ती मिळेल. तुम्ही फिरायला जा, पावसात जा, चिखलात बसा. शेतातही काम करा, पायी चालत जा आणि शंख वाजवा, या गोष्टी प्रतिकारशक्ती वाढते."
कोरोना टाळण्यासाठी औषध खाण्याची नक्कीच गरज नाही, असे खासदार सुखबीरसिंह जौनपुरिया यांनी म्हटले आहे. स्वत: सुखबीरसिंह जौनपुरिया यांनी चिखलात अंघोळ करून आणि शंख वाजवून आपली प्रतिकारशक्ती वाढवल्याचा दावा केला आहे. तसेच, सुखबीरसिंह जौनपुरिया यांनी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चांगली पाने आणि कोरफड खाण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, याआधी भाभीजी पापड खाल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही, असे सांगणारे भाजपाचे खासदार अर्जुन मेघवाल यांनाच कोरोनाची लागण झाली आहे.