टूलकिट प्रकरण : निकिता जेकबला उच्च न्यायालयाकडून दिलासा, तीन आठवड्यांचा ट्रान्झिट जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 02:09 AM2021-02-18T02:09:32+5:302021-02-18T06:37:43+5:30

Toolkit Case: Bombay High Court Holds Nikita Jacob's Arrest For 3 Weeks : संबंधित दिल्ली न्यायालयात जाऊन जामिनासाठी अर्ज करण्याकरिता निकिता यांना तीन आठवडे अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे.

Toolkit case: High Court grants relief to Nikita Jacob, grants three-week transit bail | टूलकिट प्रकरण : निकिता जेकबला उच्च न्यायालयाकडून दिलासा, तीन आठवड्यांचा ट्रान्झिट जामीन मंजूर

टूलकिट प्रकरण : निकिता जेकबला उच्च न्यायालयाकडून दिलासा, तीन आठवड्यांचा ट्रान्झिट जामीन मंजूर

Next

मुंबई : शेतकरी आंदोलनाशी संबंधित असलेल्या टूलकिट प्रकरणी संशयित असलेल्या वकील व सामाजिक कार्यकर्त्या निकिता जेकब यांना तीन आठवड्यांचा ट्रान्झिट जामीन उच्च न्यायालयाने बुधवारी मंजूर केला.
न्या. प्रकाश नाईक यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने जेकब यांना तीन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले आहे. या कालावधीत दिल्ली पोलीस निकिता यांना अटक करू शकत नाही. संबंधित दिल्ली न्यायालयात जाऊन जामिनासाठी अर्ज करण्याकरिता निकिता यांना तीन आठवडे अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. या कालावधीत दिल्ली पोलिसांनी निकिता यांना अटक केली तर त्यांची २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटका करण्याचे आदेशही न्या. नाईक यांनी दिले आहेत. अर्जदार (जेकब) ही मुंबईची कायमस्वरुपी रहिवासी आहे आणि गुन्हा दिल्लीत नोंदविण्यात आला आहे. तिला देण्यात आलेला जामीन तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, अर्जदाराला अन्य राज्यात जाऊन जामीन मिळवण्याची सोय करावी लागेल. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाच्या दिलासा देण्यात यावा, असे माझे मत आहे’, असे न्यायालयाने म्हटले.

दिल्ली न्यायालयाकडून अजामिनपात्र वाॅरंट
- अर्जदाराला तीन आठवड्यांचा ट्रान्झिट जामीन मंजूर करण्यात येत आहे. जेणेकरून त्यांना दिल्लीच्या न्यायालयात जामीन अर्ज करण्यासाठी वेळ मिळेल, असे न्या. नाईक यांनी म्हटले. तसेच औरंगाबाद खंडपीठाने याच प्रकरणातील संशयित शंतनू मुळूक यांनाही १० दिवसांचा ट्रान्झिट जामीन मंजूर केल्याची दखलही यावेळी न्या. नाईक यांनी घेतली. 
- निकिता जेकब मुंबई उच्च न्यायालयात वकिलीचा सराव करतात. दिल्ली पोलिसांच्या विनंतीवरून दिल्ली न्यायालयाने निकिता जेकब यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट बजावले.

सर्च वॉरंट नसतानाही दिल्ली पोलिसांनी घरातून नेली हार्डडिस्क
घराचे सर्च वॉरंट नसतानाही १२ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली पोलिसांनी घराची झडती घेत घरातील कॉम्प्युटरची हार्डडिस्क, एक पुस्तक व इतर साहित्य नेल्याची तक्रार टूलकिट प्रकरणातील संशयित पर्यावरणवादी कार्यकर्ता शंतनूचे वडील तथा येथील माजी नगराध्यक्ष शिवलाल मुळूक यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिसांना लेखी निवेदन दिले आहे.
शिवलाल मुळूक यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १२ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वाजेदरम्यान त्यांच्या चाणक्यापुरी (बीड) येथील घरी दोन व्यक्ती आल्या. दिल्ली पोलीस असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. 
ओळखपत्र दाखवत आम्हाला शंतनूविषयी चौकशी करावयाची असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी घराची झडती घेत शंतनूच्या रूममधून संगणकाची हार्डडिस्क, पुस्तक जप्त केले. 

Web Title: Toolkit case: High Court grants relief to Nikita Jacob, grants three-week transit bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.