स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात हजर राहा, अन्यथा हजेरी घेतली जाईल; सरकारी बाबूंना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 07:48 AM2018-08-07T07:48:51+5:302018-08-07T07:50:08+5:30
पंतप्रधान मोदी पाचव्यांदा देशाला लाल किल्ल्यावरुन संबोधित करणार
नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहा, असा आदेश दिल्लीतील महत्त्वाच्या सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला हजर राहण्याचे आदेश सर्व सरकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला सरकारचे सर्व मंत्री, महत्त्वाचे राजकीय नेते, राजदूत, उच्चायुक्त उपस्थित असतात. पुढील स्वातंत्र्य दिनाआधी देशात सार्वत्रिक निवडणुका होत असल्यानं मोदी सरकारसाठी हा स्वातंत्र्य दिन महत्त्वाचा आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सक्त आदेश सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यासाठी सर्व विभागांना 1 ऑगस्ट रोजी सूचना देण्यात आल्या आहेत. कॅबिनेट सचिवांकडून या सूचना देण्यात आल्या असून त्यामधून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. 'स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान देशाला संबोधित करत असल्यानं हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी सोहळ्यास उपस्थित राहावं,' अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारादेखील देण्यात आला आहे. 'कॅबिनेट सचिवांच्या सूचनेनुसार सर्व अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं. कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल,' अशी ताकीद देण्यात आली आहे. लाल किल्ल्यावरुन देशवासीयांना संबोधित करण्याची मोदींची ही पाचवी वेळ असेल.