Jammu And Kashmir : मोठं यश! 'हिजबुल'चा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाईचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 09:56 AM2021-07-07T09:56:14+5:302021-07-07T09:57:50+5:30
Jammu And Kashmir And Mehrazuddin Halwai : सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाई उर्फ उबैद याला कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाई उर्फ उबैद (Mehrazuddin Halwai) याला कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ जवानांनी एका संयुक्त मोहिमेत या दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिद्दीनचा सर्वात जुना, अनुभवी आणि टॉप कमांडर्सपैंकी एक असलेल्या मेहराजुद्दीन हलवाई याचा खात्मा करण्यात आला आहे, तो अनेक मोठ्या कटामध्ये सहभागी होता. त्यामुळेच हे खूप मोठं यश आलं.
मंगळवारी रात्री उशिरा हंदवाडाच्या क्रालगुंडच्या पाजीपोरा-रेनान भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक घडून आली. मिळालेल्या माहितीनुसार, सेनेच्या 32 राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफची 92 बटालियनची एक संयुक्त टीम या भागातील मोहिमेत सहभागी झाली होती. दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाकडून हे ऑपरेशन हाती घेण्यात आलं होतं. उत्तर काश्मीरच्या हंदवाडा भागात झालेल्या चकमकी दरम्यान सुरक्षा दलाच्या हाती मोठं यश आलं. मेहराजुद्दीन याचा खोऱ्यात अशांतता पसरवण्यात तसंच अनेक दहशतवादी कारवायात थेट सहभाग होता.
One of the oldest & top-commander of Hizbul Mujahideen terror-outfit Mehrazuddin Halwai @ Ubaid got neutralised in Handwara encounter. He was involved in several terror crimes. A big success: IGP Kashmir
— ANI (@ANI) July 7, 2021
परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने सर्च ऑपरेशन सुरू आहे. काश्मीरमध्ये दहशतवादाचाच खात्मा करण्यासाछी सुरक्षा दलाच्या वतीने सातत्याने ऑपरेशन ऑलआऊट सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता सुरक्षा दलांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. हायब्रीड दहशतवाद्यांच्या रुपात सुरक्षा दलांचे जवान श्रीनगरसह काश्मीर खोऱ्यात अडचणींचा सामना करत आहेत. दहशतवादी कारवाया घडवल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे जीवन जगणारे दहशतवादी सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
पार्ट टाईम कारवाया, फुल टाईम दहशत; 'हायब्रीड' दहशतवाद्यांमुळे वाढलं सुरक्षा दलांचं टेन्शन
कट्टर दहशतवाद्यांची बरीचशी माहिती सुरक्षा दलांकडे उपलब्ध आहे. पण सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगणाऱ्या हायब्रीड दहशतवाद्यांची फारशी नोंद सुरक्षा दलांकडे नाही. त्यामुळे या दहशतवाद्यांचा सामना करण्याचं आव्हान आता सुरक्षा दलांसमोर आहे. गेल्या काही आठवड्यांपासून श्रीनगरसह खोऱ्यांमधील सोप्या लक्ष्यांवरील हल्ले वाढले आहेत. बहुतांश घटनांमध्ये पिस्तुलधारी तरुणांचा हात असल्याचं उघड झालं आहे. सुरक्षा दलांच्या यादीत या दहशतवाद्यांची नावं नाहीत. हायब्रीड दहशतवादी पार्ट टाईम कारवाया करत असल्यानं त्यांच्यावर लक्ष ठेवणं अवघड असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.