सर्वच क्षेत्रांचा टॉप गीअर; जीएसटी संकलनात मोठी वाढ, शेअर बाजाराचीही भरारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 06:18 AM2022-11-02T06:18:49+5:302022-11-02T06:19:00+5:30
सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीतही कपात केली.
नवी दिल्ली : दसरा आणि दिवाळीच्या सणासुदीचा हंगाम सरकारसह एकूणच सर्वच क्षेत्रांसाठी लाभदायक ठरला. केंद्र सरकारने सलग आठव्या महिन्यात १.४० लाख काेटींहून अधिक जीएसटी संकलन केले. साेन्याची मागणी १४ टक्क्यांनी वाढली. वाहन विक्रीनेही टाॅप गीअर घेतला. पेट्राेल आणि डिझेलच्या विक्रीतही वाढ झाली.
सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीतही कपात केली. यावर कळस चढवला ताे शेअर बाजाराने. सेन्सेक्सनेही तब्बल ९ महिन्यांनी पुन्हा ६१ हजारांची पातळी गाठली. असा हा पंचानन राजयाेग जुळून आला ताे नाेव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी.
सिलिंडरची दरकपात
सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर ११५.५० रुपयांनी कमी केल्याने मुंबईत १९ किलाेचा सिलिंडर आता १,८११ रुपयांना मिळेल.
जीएसटी संकलन १.५२ लाख कोटी
ऑक्टाेबर महिन्यात तब्बल १.५२ लाख काेटी रुपये एवढे जीएसटी संकलन झाले. आतापर्यंतचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे जीएसटी संकलन ठरले आहे. या संकलनामध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे. विशेष म्हणजे, सलग आठ महिन्यांपासून जीएसटी संकलन १.४० लाख काेटी रुपयांपेक्षा जास्त राहिले आहे.
साेन्याची मागणी १४% वाढली :
सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत साेन्याची मागणी १४ टक्क्यांनी वाढून तब्बल १९१.७ टनांवर पाेहाेचली. ही मागणी काेराेनापूर्व काळापेक्षा जास्त झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १६८ टन एवढी मागणी हाेती. तर २०१९ मध्ये याच कालावधीत साेन्याची मागणी १२३ टन एवढी हाेती.
वाहनविक्रीत ३०% वाढ
ऑक्टाेबर महिन्यातील प्रवासी वाहनविक्रीचे आकडे जाहीर करण्यात येत आहेत. जवळपास सर्वच कंपन्यांनी दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर जाेरदार विक्री केलेली आहे. प्रवासी वाहनविक्रीत सरासरी ३० ते ३५ टक्के वाढ झाली आहे, तर दुचाकीची विक्रीही वाढलेली आहे.
इंधन आणि विजेचीही मागणी वाढली
या काळात लाेकांनी भरपूर प्रवास केला, मागणी-पुरवठ्याच्या साखळीमुळे मालवाहतूकही वाढल्याने ऑक्टाेबरमध्ये देशातील पेट्राेल आणि डिझेलची मागणी १२ टक्क्यांनी वाढली. याशिवाय ऑक्टाेबरमध्ये विजेचीही मागणी वाढून ११४.६४ अब्ज युनिट एवढी झाली.
रेल्वेचीही कमाई!
रेल्वेचीही कमाई या आर्थिक वर्षात १७ टक्क्यांनी वाढली आहे. एप्रिल ते ऑक्टाेबर या काळात रेल्वेने मालवाहतुकीतून ९२ हजार ३४५ काेटी रुपयांची कमाई केली. गेल्या वर्षी हा आकडा ७८ हजार ९२१ एवढा हाेता.
सेन्सेक्सचा उच्चांक
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३७५ अंकांच्या उसळीसह ६१,१२१ अंकांवर बंद झाला. तब्बल ९ महिन्यांनी हा टप्पा गाठला असून, यापूर्वी १७ जानेवारीला सेन्सेक्स या पातळीवर बंद झाला हाेता. निफ्टीही १३३ वधारून १८,१४५ अंकांवर बंद झाला.