PoKमध्ये ब्लड बँकेच्या नावाखाली सेक्स रॅकेट, JuDच्या नेत्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 04:54 PM2020-04-23T16:54:02+5:302020-04-23T16:55:36+5:30
स्थानिक पोलिसांनी सैयद समीर बुखारी याला अटक केल्याने जमात-उल-दावाचे सत्य समोर आले आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानमधील जमात-उत-दावा (JuD) या दहशतवादी संघटनेचा नेता सैयद समीर बुखारी याला सेक्स रॅकेटप्रकरणी पाकव्याप्त काश्मीरमधील बाग शहरात अटक करण्यात आली आहे.
सैयद समीर बुखारी हा जमात-उत-दावा संघटनेशी संबंधित अल-महफिज फाऊंडेशन चालवत होता. हे फाऊंडेशन मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदच्या नेतृत्वातील दहशतवादी संघटना जमात-उत-दावाचा एक हिस्सा आहे.
वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दुसर्याच दिवशी पोलिसांनी सैयद समीर बुखारी याला अटक केली. व्हायरल व्हिडिओमध्ये तो बाग शहरामध्ये असलेल्या कार्यालयात महिलांची छेडछाड करताना सापडला आहे. सैयद समीर बुखारी हा एका ब्लड बँकेच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सैयद समीर बुखारी हा एकेकाळी जमात-उल-दावाचे प्रमुख हाफिज सईद यांचा एक महत्त्वाचा व्यक्ती होता. पाकव्याप्त काश्मीरमध्ये तो भारतविरोधी आंदोलने आणि इतर कारवायांचे आयोजन करत होता. अद्यापही हे काम त्याच्याकडून केले जाते.
जमात-उल-दावा संघटना स्वत: ला काश्मिरी जनतेचा हितकारक म्हणून मिरवत होती. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून सेक्स आणि ड्रग रॅकिंगमध्ये गुंतलेली संघटना म्हणून ओळखली जात आहे. स्थानिक पोलिसांनी सैयद समीर बुखारी याला अटक केल्याने जमात-उल-दावाचे सत्य समोर आले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्येच नव्हे तर पाकिस्तानच्या इतर भागातही या संघटनेकडून असेच काम चालते.