सीमेवरचा सर्वांत उंच तिरंगा झाला नामुश्कीचा विषय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:32 AM2017-08-01T01:32:31+5:302017-08-01T01:33:26+5:30
येथून जवळच असलेल्या पाकिस्तानच्या अट्टारी सीमेजवळ चार महिन्यांपूर्वी मोठ्या दिमाखात उभारण्यात आलेला देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज ‘नामुश्की’चा विषय झाला असून, येत्या स्वातंत्र्यदिनी तो तिरंगा फडकेल का? याविषयी साशंकता आहे.
अमृतसर : येथून जवळच असलेल्या पाकिस्तानच्या अट्टारी सीमेजवळ चार महिन्यांपूर्वी मोठ्या दिमाखात उभारण्यात आलेला देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज ‘नामुश्की’चा विषय झाला असून, येत्या स्वातंत्र्यदिनी तो तिरंगा फडकेल का? याविषयी साशंकता आहे.
१२० फूट लांब आणि ८० फूट रुंदीचा हा तिरंगा ३६० फूट उंच ध्वजस्तंभावर ५ मार्चला फडकविण्यात आला. हा राष्ट्रध्वज पाकिस्तानमधूनही दिसतो म्हणून तो अभिमानाचा विषय ठरला होता. अट्टारी सीमेवर रोज सायंकाळी भारत व पाकिस्तानच्या सीमा सैनिकांचा होणारा ‘चेंज आॅफ गार्ड’ पाहण्यासाठी येणाºया पर्यटकांचेही तो आकर्षण ठरला होता. परंतु सोसाट्याच्या वाºयाने हा राष्ट्रध्वज तीन वेळा फाटला. एकदा उच्चदाबाच्या वीजवाहक तारांमध्ये अडकला आणि तो पूर्ववत करेपर्यंत परिसरातील गावांचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागला. फाटका ध्वज फडकविणे हा गुन्हा असल्याने तो कायमचा खाली उतरविण्यात आला. तो उभारण्यासाठी ३.५ कोटी रुपयांचा खर्च झाला होता. फाटलेला ध्वज दुरुस्त करून पुन्हा फडकविण्यासाठी १ लाख रुपयांहून अधिक खर्च येतो. आत्तापर्यंत सहा लाख रुपये खर्च झाले आहेत.
अमृतसरचे उपआयुक्त कमलदीप सिंग संघा यांनी पंजाब सरकारच्या गृह विभागाला कळविले की, राष्ट्रध्वज उतरवावा लागणे ही ‘नामुश्की’ आहे. ध्वज डौलाने फडकत राहील यासाठी मार्ग काढावा! राज्य सरकारला अद्याप तोडगा सापडलेला नाही. (वृत्तसंस्था)