इच्छा मरण, समाधी, देहत्याग, वगैरे.. वगैरे...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 09:45 AM2018-03-13T09:45:28+5:302018-03-13T09:45:28+5:30
इच्छा मरणाची गरज खरंच आहे का, ते न्याय्य आहे का, त्याला वैधानिक संमती मिळाल्यानंतर त्याचा गैरवापर होणार नाही का?
- संकेत सातोपे
मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने काही अटींवर इच्छामरणाला परवानगी दिल्यानंतर, याबाबत नव्याने चर्चेची वादळे उठली आहेत. इच्छा मरणाची गरज खरंच आहे का, ते न्याय्य आहे का, त्याला वैधानिक संमती मिळाल्यानंतर त्याचा गैरवापर होणार नाही का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत; पण या प्रश्नांची उत्तरे अन्य कोणत्याही सामाजिक निर्बंधांप्रमाणेच सापेक्ष आहेत. त्यामुळेच अन्य सामाजिक प्रश्नाप्रमाणेच यासंदर्भातही मागे वळून पूर्वसुरींनी घालून दिलेल्या पायंड्याचे मासले तपासणे अधिक उद्बोधक ठरते. जसे की, लिव्ह इन रेलेशनशीपच्या वैधानिक मान्यतेबाबत निकाल देताना, न्यायालयाने राधाकृष्णाचा दाखला दिला होता.
इच्छा मरणाच्या या ताज्या निकालाबद्दलही भारतीय सांस्कृतिक- ऐतिहासिक संदर्भ तपासून पाहता असे दिसते की, मरण अडवून धरणाऱ्या भीष्माचार्यांपासून ते ओढावून आणणाऱ्या कुमारील भट्ट, आद्य शंकराचार्य, ते अगदी ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत अनेक महात्म्यांनी इच्छामरण या संकल्पनेचा यथायोग्य उपयोग केला. आत्महत्या कोणत्याही संस्कृतीने त्याज्य आणि निषेधार्हच मानली आहे, पण नैसर्गिक मृत्यू येण्याआधी स्वेच्छेने जीवन संपविण्याच्या प्रत्येक क्रियेला आत्महत्या मानण्यात आलेले नाही. आपले इप्सित साध्य होण्यात अपयश आले, गोष्टी मनाविरुद्ध घडत आहेत, म्हणून निराश होऊन जीव देण्याला आत्महत्या मानण्यात येते. पण आपण योजिलेल्या जीवितकार्याची पूर्तता झाली, म्हणून समाधानाने स्वेच्छेने जीवन थांबविणे, याला समाधी किंवा आत्मार्पणच मानले गेले आहे.
भावार्थ दीपिका, अमृतानुभवासारखे ग्रंथ लिहून, समाज प्रबोधनाचे मोठे कार्य उभे केल्यानंतर जीवनाची इतिकर्तव्यता झाल्याचे जाणवताच ज्ञानेश्वर माउलींनी ऐन तारुण्यात समाधी घेतली. अशीच कथा आद्य शंकराचार्यांचीही, अद्वैत मताचा भारतभर पुरस्कार करून, देशात चार दिशांना चार पीठांची स्थापना केल्यानंतर शंकराचार्यांनी थेट गृहप्रवेश करून, आपला ऐहिक प्रवास थांबविला. पश्चिम बंगालमधील वैष्णव मताचे कट्टर पुरस्कर्ते चैतन्य महाप्रभूंची आत्मर्पणाची कथा तर फारच रोचक आहे. श्रीकृष्ण भक्तीभावात तल्लीन होऊन भजन गात गात भक्तांसमवेत वाटेने चालत असतानाच अचानक महाप्रभूंनी समुद्रात उडी घेतली आणि ते समाधिस्थ झाले. संत एकनाथ महाराजांनीही अशाच प्रकारे नदीत समाधी घेतली होती.
कार्यपूर्तीनंतर देहत्याग केल्याची जशी संतांची अनेक उदाहरणे आहेत, तशीच उदाहरणे देशभक्तांचीही पाहाता येतील. यातील चटकन आठवणीत येणारे नाव म्हणजे चंद्रशेखर आझाद. ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात जखमी होऊन, घेरले गेलो आहोत आणि आता निसटणे अशक्य आहे, हे लक्षात येताच आझाद यांनी स्वतःच्याच डोक्याला पिस्तुल लावले. गोऱ्यांच्या हाती लागून बंदिवासात मरण्यापेक्षा स्वतःच स्वतःचा देह विसर्जित करणे त्यांना श्रेयस्कर वाटले. दिल्लीचे अखेरचे हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान आणि त्यांचा सेवक-मित्र चंदबरदायीबाबतही अशीच कथा सांगितली जाते. मोहम्मद घोरीसारख्या क्रूरकर्म्याच्या हातून मृत्यू स्वीकारण्यापेक्षा या दोन घनिष्ठ मित्रांनी अखेर कारागृहात एकमेकांची मान उडवली. शत्रूच्या हातात पडण्यापूर्वी राजपूत स्त्रियाही जोहर करून नैसर्गिक मृत्यू येण्यापूर्वी जीवन संपवीत असत.
मनुष्य जीवन संपविण्यासाठी नैसर्गिक मृत्यू हा एकमेव न्याय, नैतिक मार्ग असून अन्य सर्व प्रकार हत्या- आत्महत्या या अपराधात मोडतात. अशी धारण न होण्यासाठी वरील दाखले पुरेसे बोलके आहे. शेवटी कोणतीही क्रिया योग्य की अयोग्य हे त्यामागील हेतुवरूनच ठरवता येते. त्यामुळे मानवी मृत्यू अर्थात देहान्त, हा कोणत्या क्रियेने झाला याऐवजी कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या उद्देशाने झाला यावरूनच त्याचे योग्य- अयोग्यत्व ठरविता येते. यापुढे माझ्याकडून देशकार्य होणार नाही, माझा देह केवळ भारभूत होऊनच राहील, या धारणेतून स्वा. सावरकरांनी प्रायोपवेशन(अन्नत्याग) क्रियेद्वारे पत्करलेला मृत्यू, म्हणूनच आत्महत्या ठरत नाही. त्याचप्रमाणे रुग्णालयात कितपत पडून आप्तस्वकीयांना त्रास देत केवळ श्वासोच्छ्वासापूरते जिवंत असण्यापेक्षा सुखाने मृत्यूला कवटाळले हे अयोग्य ठरत नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने यावरच मोहर उमटवली आहे.