टॉपर्स घोटाळा; सूत्रधारास पत्नीसह अटक
By admin | Published: June 21, 2016 07:27 AM2016-06-21T07:27:40+5:302016-06-21T07:27:40+5:30
बिहारच्या इंटरमिडिएट परीक्षेतील टॉपर्स घोटाळ्याचा सूत्रधार बिहार शालेय परीक्षा मंडळाचा माजी अध्यक्ष (बीएसईबी) लालकेश्वर प्रसाद सिंग आणि त्याची
पाटणा : बिहारच्या इंटरमिडिएट परीक्षेतील टॉपर्स घोटाळ्याचा सूत्रधार बिहार शालेय परीक्षा मंडळाचा माजी अध्यक्ष (बीएसईबी) लालकेश्वर प्रसाद सिंग आणि त्याची पत्नी जदयूची माजी आमदार
उषा सिन्हा यांना सोमवारी उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे अटक करण्यात आली.
पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनु महाराज यांनी ही माहिती दिली. टॉपर्स घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख असलेले मनु महाराज यांनी सांगितले की, ‘हे दाम्पत्य शेजारील उत्तर प्रदेशात वाराणसी येथे एका मंदिरात लपून बसले असल्याची गोपनीय सूचना मिळाली होती. त्यानंतर, ही कारवाई करण्यात आली.’
बिहार इंटरमिडिएट परीक्षेतील गैरप्रकारासंबंधात पोलिसांनी लालकेश्वर सिंग आणि त्याची पत्नी उषा सिन्हा यांच्याविरुद्ध पाटणा उच्च न्यायालयाकडून अटक वॉरंट मिळविल्यापासून दोघेही भूमिगत
झाले होते. लालकेश्वरसिंगची संपत्ती जप्त करण्याचा आदेशही एसआयटीकडे आहे. हिलसा येथील जदयूच्या माजी आमदार आणि येथील गंगादेवी कॉलेजच्या प्राचार्य पदावरून हटविण्यात आलेल्या उषा सिन्हा या प्रकरणी सहआरोपी आहेत.
वैशालीतील बिशुन राय कॉलेजचा सचिव आणि सहप्राचार्य बच्चा राय याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यानेच पदवी रॅकेटचे सूत्रधार लालकेश्वर सिंग आणि त्याच्या पत्नीबद्दल पोलिसांना माहिती दिली होती. राज्यात बारावीच्या परीक्षेत कला आणि विज्ञान शाखेचे टॉपर्स अनुक्रमे रुबी राय आणि सौरभ श्रेष्ठ हे याच कॉलेजचे विद्यार्थी आहेत. (वृत्तसंस्था)