माझा जो छळ झाला त्याची माफी मागणार का? - साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 11:45 AM2019-04-20T11:45:37+5:302019-04-20T11:46:17+5:30
माझ्यावर जो छळ झाला त्याची माफी मागणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे साध्वी यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा वादाला तोंड फुटू शकतं.
भोपाळ - शहीद हेमंत करकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधान भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी रात्री उशीरा मागे घेतलं असलं तरी पुन्हा एकदा सकाळी पत्रकार परिषद घेत माझ्यावर जो छळ झाला त्याची माफी मागणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे साध्वी यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा वादाला तोंड फुटू शकतं.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप घडत असताना भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. साध्वी यांच्या विधानाने देशभरात संतापाची लाट उसळली. शहीद करकरे यांच्या विधानावरुन विरोधकांनीही भारतीय जनता पार्टीला कोंडीत पकडण्याची खेळी साधली. भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. साध्वी यांच्या उमेदवारीवरुन विरोधकांनी भाजपाला प्रश्न केले. त्यातच साध्वी यांनी करकरेंबद्दल केलेल्या विधानामुळे भाजपा अडचणीत आली.
शुक्रवारी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलेल्या विधानावर भारतीय जनता पार्टीने फारकत घेत साध्वी यांनी केलेलं विधान हे त्यांचे वैयक्तिक मतं आहे. त्यांनी केलेलं विधान चुकीचं आहे. त्यांनी दिलेलं विधान हे त्यांच्या मानसिक त्रासातून दिली असावी असंही भाजपाकडून सांगण्यात आलं. यानंतर रात्री उशीरा साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी माझ्या विधानाचा फायदा देशाचे शत्रुंना होईल त्यामुळे मी माझं विधान मागे घेत असल्याचं सांगितलं. मी केलेलं वक्तव्य माझं वैयक्तिक असून त्यासाठी मी माफी मागते असं साध्वी यांच्याकडून सांगण्यात आलं.
शहीद हेमंत करकरेंवरील विधानाबाबत प्रज्ञा सिंह यांनी मागितली माफी https://t.co/fBPnIpLTNE
— Lokmat (@MiLOKMAT) April 19, 2019
मुंबईवर २००८ साली झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना हेमंत करकरे व त्यांचे सहकारी अशोक कामटे व विजय साळस्कर शहीद झाले होते. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह प्रमुख आरोपी आहेत. आपण आजारी असून, स्तनांचा कर्करोग झाला आहे, कोणाच्याही आधाराशिवाय आपल्याला चालता येत नाही, अशी विनंती करून त्यांना जामिनासाठी अर्ज केला आणि त्याच कारणामुळे तो न्यायालयाने मंजूर केला. सुटल्यानंतर अलीकडेच त्यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भोपाळमध्ये काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात त्या लढत देत आहेत.