अल्पवयीनेवर शिक्षकाकडून अत्याचार, कोलकात्यातील प्रकार; संतप्त पालकांची घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 02:08 AM2017-12-02T02:08:51+5:302017-12-02T02:09:23+5:30
कोलकाता येथील जी. डी. बिर्ला स्कूलमधील एका चार वर्षीय मुलीवर शिक्षकाने शौचालयात अत्याचार केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
कोलकाता : येथील जी. डी. बिर्ला स्कूलमधील एका चार वर्षीय मुलीवर शिक्षकाने शौचालयात अत्याचार केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
प्राथमिक तपासातून असे समोर आले आहे की, या शिक्षकाने चार वर्षीय मुुलीला प्रलोभन दाखवून शौचालयात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण गुरुवारचे आहे. या मुलीने आपल्या आईला घटनेची माहिती सांगितल्यानंतर पालक शाळेत गेले. दोषींवर कारवाई केली जाईल, असा शब्द शाळेच्या व्यवस्थापनाने दिला आहे. या शाळेतील पालक शुक्रवारी मोठ्या संख्येने एकत्र आले आणि शाळेविरुद्ध घोषणाबाजी केली. तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप हे पालक करत होते. त्यानंतर, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. (वृत्तसंस्था)
बिर्ला स्कूलमध्ये अशा घटनेची दुसरी वेळ
या मुलीच्या वडिलांनी सांगितले की, जी.डी. बिर्ला स्कूलमध्ये अशी घटना होण्याची ही दुसरी वेळ आहे. एका विद्यार्थिनीवर २०१४ मध्ये अत्याचार झाला होता आणि शाळेने काहीच कारवाई केली नव्हती. या घटनेमुळे माझ्या पत्नीला धक्का बसला आहे. मुलीवरही आघात झाला आहे. शाळेतील एका शिक्षकाला तिने ओळखले आहे. आम्हाला आशा आहे की, न्याय मिळेल. मी आता मुलीला कधीच शाळेत पाठविणार नाही.