शशी थरूर व राजदीप सरदेसाई यांच्याविरुद्ध भोपाळमध्ये शेतकऱ्यांनेच केली पोलिसांत तक्रार
By देवेश फडके | Published: January 29, 2021 04:44 PM2021-01-29T16:44:18+5:302021-01-29T16:46:10+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नोएडानंतर आता मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये काँग्रेस नेते शशी थरूर आणि ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भोपाळ : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नोएडानंतर आता मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये काँग्रेस नेते शशी थरूर आणि ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका शेतकऱ्यानेच ही तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शशी थरूर आणि राजदीप सरदेसाई यांच्यासह अन्य काही जणांवर शांततेचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. संजय रघुवंशी नामक शेतकऱ्याने पोलिसांत ही तक्रार दाखल केली असून, दिल्लीत झालेल्या हिंसाचारासंदर्भात सोशल मीडियावर चुकीची माहिती शेअर केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
शेतकरी आंदोलनाला पाकिस्तानचे समर्थन; जो बायडन यांना दखल घेण्याची करणार विनंती
भोपाळ व्यतिरिक्त बैतूल जिल्ह्यातील मुल्ताई येथेही शशी थरूर आणि राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात एफआरआय दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नोएडा येथेही ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासह अनेक ज्येष्ठ पत्रकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये हेराल्ड ग्रुपच्या ज्येष्ठ संपादकीय सल्लागार मृणाल पांडे, कौमी आवाज या उर्दू वृत्तपत्राचे मुख्य संपादक जफर आगा, खान कारवां वृत्तपत्राचे मुख्य संपादक परेशनाथ, अनंतनाथ, विनोद के जोश यांच्यासह अन्य आठ जणांचा समावेश आहे.
पोलिसांनी रॅलीतील एका ट्रॅक्टर चालकाची हत्या केली, अशी खोटी आणि चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. आंदोलकांना चिथावणे आणि मुद्दामहून भ्रम निर्माण करणाऱ्या माहितीचा प्रसार करणे, असे आरोपही पोलिसांकडून या सर्वांवर ठेवण्यात आले आहेत.