Farmer Protest: पंतप्रधान मोदी पूर्णपणे चुकीची माहिती देताहेत- टिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 03:15 AM2020-12-19T03:15:32+5:302020-12-19T06:53:36+5:30
शेतकरी आंदोलनाचा २३ वा दिवस; किमान आधारभूत दर हा आमचा अधिकार
- विकास झाडे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला; परंतु त्यांनी सांगितलेल्या बऱ्याचशा बाबी या असत्य आहेत. मोदी कृषी क्षेत्राचे खाजगीकरण करीत असल्याची टीका शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी केली.
मोदी यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्याची दिलेली माहिती खोटी असल्याकडेही टिकेत यांनी लक्ष वेधले. त्यांनी अद्याप शेतकऱ्यांसोबत कोणतीही चर्चा केली नाही; परंतु ते सातत्याने चुकीची माहिती देत आहेत. पंतप्रधानांकडून ५०० रुपये महिन्याची भिक्षा नको तर पिकाला किमान आधारभूत मूल्य देणे हा आमचा अधिकार आहे. शेतकरी हिताच्या गोष्टी सांगून उद्योजकांच्या हाती शेतकऱ्यांची मानगूट देण्याचा मोदींचा प्रयत्न आहे, तो आम्ही हाणून पाडू. उस उत्पादकांना १६ कोटी रुपयांची मदत करीत असल्याचा मोदींचा दावाही टिकेत यांनी खोटा ठरविला. ते म्हणाले, साखर कारखान्यांना शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे होते. केंद्र सरकार जर ही मदत करणार असेल तर ती शेतकऱ्यांना नव्हे तर साखर उद्योजकांना असेल.
शेतकरी आंदोलनाच्या २३ व्या दिवशीही शेतकऱ्यांमध्ये प्रतिकुल परिस्थितीतही जोश दिसून आला. कॉँग्रेसचे नेते बॉक्सर विजेंद्र सिंह यांनी शुक्रवारी टिकरी सीमेवर शेतकऱ्यांना भोजन वितरित केले. जमींदारा विद्यार्थी संघटनेतर्फे लंगरचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी मजूर संघर्ष समितीचे महासचिव श्रवण सिंह पंढेर यांनी कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे पत्र शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करणारे असून त्यात नवीन काहीच नसल्याचे सांगितले.
मिरची हिरवी असते की लाल!
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मेरठ येथील एका सभेत कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, ज्यांनी ७० वर्षे शेतकऱ्यांचे शोषण केले ते आज आपल्या राजकीय अस्तित्वासाठी नाटक करीत आहेत. मिरची हिरवी असते की लाल हे संसदेत राहुल गांधी सांगू शकत नाहीत. त्यांना शेतीचे किती ज्ञान आहे हे शेतकऱ्यांना चांगले ठाऊक आहे.