बेगुसरायमध्ये कन्हैया कुमारची वाट बिकट, मतविभागणी वाढवणार कटकट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 08:54 PM2019-04-02T20:54:32+5:302019-04-02T21:52:30+5:30
डाव्या विचारांचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि भाजपाचा कडवा हिंदुत्ववादी चेहरा असलेले गिरिराज सिंह हे आमने-सामने येणार असल्याने बिहारमधील बेगुसराय मतदारसंघ देशपातळीवरील राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.
बेगुसराय - डाव्या विचारांचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि भाजपाचा कडवा हिंदुत्ववादी चेहरा असलेले गिरिराज सिंह हे आमने-सामने येणार असल्याने बिहारमधील बेगुसराय मतदारसंघ देशपातळीवरील राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. एकेकाळी डाव्या पक्षांचा गड असलेल्या या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली होती. दरम्यान, यावेळच्या निवडणुकीत भाकपला महाआघाडीने जागावाटपात बेगुसराय मतदारसंघ न दिल्याने भाकपने स्वतंत्रपणे कन्हैयाला उमेदवारी दिली आहे. मात्र आरजेडीने तन्वीर हसन यांना मैदानात उतरवल्याने कन्हैया कुमारची वाट बिट झाली आहे.
कन्हैया कुमारने केंद्रात सत्ताधारी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात जोरदार आघाडी उघडली होती. त्यामुळे बिहारमध्ये सत्ताधारी एनडीएविरोधात उभ्या करण्यात आलेल्या महाआघाडीकडून कन्हैया कुमारला बेगुसराय येथून उमेदवारी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र महाआघाडीत झालेल्या जागावाटपाच्या घोळानंतर बेगुसराय येथून राजद नेते तन्वीर हसन यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे भाकपने कन्हैया कुमार याला स्वतंत्रपणे रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र या दोन्ही उमेदवारांमध्ये होणाऱ्या मतविभागणीचा लाभ गिरिराज सिंह यांना मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कन्हैया कुमार आणि गिरिराज सिंह यांच्यात थेट लढत झाली असती तर त्याचा फायदा कन्हैया कुमार याला झाला असता. मात्र तिरंगी लढतीमुळे मतांचे गणित बिघडणार असल्याचा दावा राजकीय विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. कन्हैया कुमारवर झालेला देशद्रोहाच्या आरोपामुळे त्याच्याविरोधात प्रखर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून गिरिराज सिंह यांना उरवण्याचा निर्णय भाजपाने घेतला. गिरिराज सिंह हे सुरुवातीला येथून लढण्यास इच्छुक नव्हते. मात्र मनधरणीनंतर त्यांनी बेगुसराय येथून कन्हैया कुमारच्या विरोधात लढण्यास होकार दिला.
2014 मध्ये भाजपाच्या भोला सिंह यांनी आरजेडीच्या तन्वीर हसन यांना 58 हजार मतांनी पराभूत केले होते. भोला सिंह हे सुद्धा पूर्वाश्रमीचे भाकपचे माजी नेते होते. नंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. दरम्यान 2014 मध्ये त्यांना एकूण मतदानाच्या 39.72 टक्के म्हणजे 4 लाख 28 हजार मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी तन्वीर हसन यांना 34.31 टक्के म्हणजे 3 लाख 70 हजार मते मिळाली होती. तर भाकपचे उमेदवार राजेंद्र प्रसाद सिंह यांना 17.87 टक्के म्हणजेच दोन लाख मते मिळाली होती.