हार्दिक पटेल यांना अवघड पिच; भाजपने या जागेसाठी दिली उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 10:45 AM2022-11-23T10:45:15+5:302022-11-23T10:45:42+5:30
२९ वर्षीय पटेल अहमदाबादच्या विरमगाम तालुक्यातील चंद्रनगर गावचे रहिवासी आहेत. ते विरमगाममध्ये लहानाचे मोठे झाले. त्यांची ही पहिली विधानसभा निवडणूक.
विरमगाम : गुजरातमधील सत्ताधारी भाजपने नुकतेच पक्षात आलेले तरूण पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना काँग्रेसकडील विरमगाम जागा हिसकावून घेण्यासाठी उमेदवारी दिली आहे.
२९ वर्षीय पटेल अहमदाबादच्या विरमगाम तालुक्यातील चंद्रनगर गावचे रहिवासी आहेत. ते विरमगाममध्ये लहानाचे मोठे झाले. त्यांची ही पहिली विधानसभा निवडणूक. त्यांची लढत काँग्रेसचे विद्यमान आमदार लखाभाई भारवाड यांच्याशी असेल. भारवाड यांनी २०१७मध्ये भाजपच्या तेजश्री पटेल यांचा पराभव केला होता. यापूर्वी काँग्रेसकडून लढताना तेजश्री विजयी झाल्या होत्या. मात्र भाजपमध्ये जाताच त्यांचा दुसऱ्या निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसला या जागेवर विश्वास आहे. भाजपने पटेल यांना या रिंगणात उतरवले आहे. पण, इतिहास पाहता त्यांना ही निवडणूक अवघड जाऊ शकते.
जातीय समीकरणे
- विरमगाममध्ये ६५,००० ठाकोर (ओबीसी) मतदार, ५०,००० पाटीदार किंवा पटेल मतदार, ३५,००० दलित, २०,००० भारवाड व रबारी समाजाचे मतदार, २०,००० मुस्लीम, १८,००० कोळी समाजाचे सदस्य असे तीन लाख मतदार आहेत. मात्र, या मतदारसंघाने आतापर्यंत वेगवेगळ्या जातींचे उमेदवार निवडून दिले आहेत.