काश्मीरमध्ये पर्यटन व्यवसाय शून्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 05:14 AM2019-09-03T05:14:15+5:302019-09-03T05:14:37+5:30
टॅक्सी मालक त्रस्त : पर्यटक नसल्याने शेकडो वाहने जागच्या जागीच; व्यवसायासाठी घेतलेले कर्ज थकले
श्रीनगर : काश्मीरमधील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसलेला आहे. मोहम्मद सुलतान (४७) हे टॅक्सीचे मालक असले तरी सध्या काळजीत पडले आहेत. कारण त्यांनी नवी टोयोटा क्रिस्टा कार खास पर्यटन व्यवसायासाठी १९ लाख रुपयांना विकत घेतली तरी गेल्या महिनाभरापासून त्यांना व्यवसाय मिळालेला नाही.
जुलै महिन्यात अमरनाथ यात्रा सुरू व्हायच्या तोंडावर कार त्यांनी घेतली ती काही व्यवसाय होईल या आशेने. सुलतान यांनी १० लाख रुपये स्वत:कडील उभे केले व राहिलेले बँकेकडून कर्ज घेतले. व्यवसायच नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यांत मी बँकेचा मासिक १८ हजार रुपयांचा कर्जहप्ताही फेडू शकलेलो नाही, असे ते म्हणाले.
आपली सगळी स्वप्ने पर्यटन व्यवसाय ऐन भरात असताना एका फटक्यात जमिनीवर येईल याची त्यांना किंचितही कल्पना नव्हती. अमरनाथ यात्रा कळसाकडे असताना जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा दिलेले घटनेतील अनुच्छेद ३७० रद्द केल्याची बातमी आली आणि काश्मीरमधील अर्थव्यवस्था जागच्या जागी थबकली. मी कर्जफेड करू शकलो नाही हा माझ्यासाठी मोठा तोटाच आहे. गेल्या २५ वर्षांपासून मी या व्यवसायात आहे; परंतु अशी वाईट परिस्थिती मी कधी पाहिली नव्हती. कोणत्याही सामान्य दिवशी मी तीन हजार रुपयांपेक्षा जास्त कमाई करतो; परंतु अनुच्छेद ३७० रद्द झाल्यापासून एक रुपयादेखील कमाई झालेली नाही, असे सुलतान यांनी सांगितले.
टॅक्सी ठप्पच
च्या परिस्थितीला तोंड देणारे सुलतान हे एकटे नाहीत. येथील बोलव्हार्ड टुरिस्ट टॅक्सी स्टँडवर अशा २०० टॅक्सीज आहेत. सध्या त्यांना काही कामच नाही. च्बरेच टॅक्सीमालक आणि चालक या क्षणाला बेरोजगार आहेत. त्यांना खोऱ्यातील परिस्थिती लगेचच सामान्य होईल याबद्दल शंका आहे. या टॅक्सी स्टँडचा रोजचा व्यवसाय पाच लाख रुपयांचा असतो, तो आज शून्यावर आला आहे.