पर्यटक व प्रवाशांची पसंती दिल्ली आणि मुंबईला...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 07:08 AM2021-10-27T07:08:57+5:302021-10-27T07:13:35+5:30
Tourists : डिजिटल ट्रॅव्हल संस्थेतर्फे एक सर्वेक्षण करण्यात आले हाेते. त्यातून सर्वाधिक प्रवास होणाऱ्या ठिकाणांचा आढावा घेण्यात आला.
नवी दिल्ली : पर्यटकांसोबतच नियमित प्रवाशांची संख्याही वाढू लागली आहे. प्रवाशांची काेणत्या शहरांना पसंती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे दिल्ली, मुंबई आणि गाेवा. मात्र, मुंबईने गाेव्यावर मात करून दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
डिजिटल ट्रॅव्हल संस्थेतर्फे एक सर्वेक्षण करण्यात आले हाेते. त्यातून सर्वाधिक प्रवास होणाऱ्या ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. त्यात प्रवाशांनी सर्वाधिक दिल्लीची वारी केल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर मुंबई आणि गाेव्याचा समावेश आहे.
थंड हवेच्या ठिकाणांना सर्वाधिक पसंती
पर्यटकांनी थंड हवेच्या उंचावरील ठिकाणांना पसंती दिली आहे. अशा १८ शहरांना पहिल्या १०० मध्ये स्थान मिळाले आहे, तर धार्मिक स्थळांनाही पर्यटकांनी प्राधान्य दिले आहे.
प्राधान्य बदलले
महामारीमुळे पर्यटकांचे प्राधान्य बदलले आहे. नव्या ठिकाणांचा शाेध घेतानाच जवळच्या पर्यटनस्थळांना पसंती देण्यात आली आहे. त्यामुळे कन्याकुमारी, पुरी, शिर्डी, अलेप्पी व रामेश्वरम यासारख्या ठिकाणांनी २० स्थानांची झेप घेतली.
काेराेना महामारीचा प्रभाव
लखनाै आणि सिमला यासारख्या ठिकाणांची अनुक्रमे १५ आणि १३ स्थानांनी घसरण झाली आहे. लेह शहराने गेल्या वर्षीच्या तुलनेत १६९ वरून थेट पहिल्या १०० ठिकाणांमध्ये झेप घेतली आहे. दाेन टप्प्यांत ही माहिती गाेळा केली. पहिला टप्पा १ जून २०१९ ते १ जून २०२०, तर दुसरा टप्पा १ जून २०२० ते जून २०२१ असा हाेता.
- मुंबई, पुणे, शिर्डी, महाबळेश्वर, लाेणावळा यांनी झेप घेतली आहे. शिर्डी ६२ वरून २५ वे स्थान मिळाले.
दक्षिण भारत पुढे : तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आणि राजस्थान येथील पर्यटनस्थळांना सर्वाधिक पसंती आहे.