VIDEO: तुमची लायकी नाही, सगळ्यांची वर्दी उतरवेन; ६ कोटींच्या कारमधून उतरलेल्या महिलेची पोलिसांशी हुज्जत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 12:57 PM2021-08-04T12:57:46+5:302021-08-04T13:04:43+5:30
महिलेसह आणखी तिघांविरोधात गुन्हा दाखल; पोलिसांसोबतची अरेरावी महागात पडली
नैनीताल: नैनीतालच्या तल्लीतालमध्ये वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू असताना एका महिलेनं पोलिसांशी हुज्जत घातली आहे. हिमाचल प्रदेशची नंबर प्लेट असलेल्या एका कारच्या काचांना ब्लॅक फिल्म लावण्यात आली होती. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक राजकुमारी सिंघानिया यांनी कार रोखली. त्यावेळी कार चालकानं महिला पोलीस अधिकाऱ्याशी वाद घातला.
कारमधील एका महिला प्रवाशानं कार रोखणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याशी उद्दाम वर्तन केलं. तिनं अधिकारी महिलेला धमकी दिली. 'या गाडीची पावती फाडण्याची तुझी लायकी नाही,' अशी भाषा कारमधील महिलेनं वापरली. तुम्हाला पैसे हवे असतील, तर सांगा. पण गाडीला काही करायचं नाही, असं म्हणत महिलेनं पोलिसांना वर्दी उतरवण्याची धमकी दिली.
बीच चौराहे पर महिला का हाई वोल्टेज ड्रामा#nainital#Uttarakhand#uttarakhandnews#Videopic.twitter.com/3NOpR6EoSZ
— Sanjay Goswami (@sanjay_goswami7) August 2, 2021
भररस्त्यात राडा सुरू असल्यानं स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात जमले. त्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. कारमधील महिला त्यांच्यावरही संतापली. तिनं त्यांचीदेखील पात्रता काढली. तुमच्यासारखी माणसं माझ्या घरात फरशी पुसायची कामं करतात, असं महिला म्हणाली. त्यामुळे स्थानिक संतापले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा मागवून परिस्थिती नियंत्रणात आणत महिलेची गाडी जप्त केली. या गाडीची किंमत ६ कोटी आहे.
भररस्त्यात पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. महिलेचं नाव स्मिता असून ती दिल्लीतल्या वसंत विहारची रहिवासी आहे. महिलेसोबत असलेल्या तिघांविरोधातही गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.