शेतक-यांसाठी लढून मोदी सरकारला झुकवू

By admin | Published: April 20, 2015 12:39 AM2015-04-20T00:39:14+5:302015-04-20T00:39:14+5:30

काँग्रेस पक्ष आज सत्तेबाहेर आहे, पण म्हणून पक्ष दुर्बल आहे, असे नाही. काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांचा लढा लढेल आणि मोदी सरकारला झुकण्यास भाग पाडेल

Towards Modi's fight for farmers | शेतक-यांसाठी लढून मोदी सरकारला झुकवू

शेतक-यांसाठी लढून मोदी सरकारला झुकवू

Next

नवी दिल्ली: काँग्रेस पक्ष आज सत्तेबाहेर आहे, पण म्हणून पक्ष दुर्बल आहे, असे नाही. काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांचा लढा लढेल आणि मोदी सरकारला झुकण्यास भाग पाडेल, अशी ग्वाही काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी दिली.
मोदी सरकारने आणलेल्या सुधारित भूसंपादन कायद्यास विरोध करण्यासाठी पक्षातर्फे रामलिला मैदानावर आयोजित शेतकरी व शेतमजुरांच्या विराट रॅलीत बोलताना सोनिया गांधी यांनीही मोदी सरकारला थेट लक्ष्य केले. सबका साथ, सबका विकास, असा नारा मोदी सरकार देत आहे, मग शेतकरीच यातून का सुटला? असा सवाल त्यांनी केला.
शेतकरी उन्मळून पडावा आणि अगतिक होऊन त्याने आपली जमीन द्यावी, असे मोदी सरकारचे षड्यंत्र आहे. बड्या कॉर्पोरेट घराण्यांना लाभ पोहोचवणे या एकाच उद्देशाने सरकार भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करू इच्छित आहे. शेतकरी मरो वा जगो, याचेशी सरकारचे काहीही देणे-घेणे नाही, असा आरोप सोनियांनी केला.
राहुल गांधी म्हणाले, निवडणूक काळात मोदींनी शेतकऱ्यांना अधिक हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. आपल्या कार्यकाळात कुठल्याच शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागणार नाही, असे ते म्हणाले होते. पण आजही आत्महत्या होत आहे. युरिया बाजारातून गायब आहे. खरेदीदार नसल्याने शेतकऱ्यांचा माल सडत आहे. राहुल म्हणाले की, मेक इन इंडिया व उद्योगक्षेत्राचा विकास हवाच आहे. पण जिथे शेतकऱ्यांनाच स्थान नाही, असा भारत आम्हाला नको आहे. हरितक्रांतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी देशाच्या विकासाचा पाया रचला होता. अशा शेतकऱ्यांना वगळून काहीही साध्य होणार नाही, असे ते म्हणाले. जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याच्या मोदी सरकारच्या आश्वासनाचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.
रॅलीत पक्षाच्या कुरबुरी
सोनिया व राहुल व्यासपीठावर येण्यापूर्वी पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांना बोलण्याची संधी मिळाली. पण यादरम्यान काँग्रेसच्या अंतर्गत कुरबुरीच तेवढ्या प्रकर्षाने समोर आल्या. हरियाणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर बोलायला उभे राहिले, तोच त्यांचे प्रबळ प्रतिस्पर्धी भूपेंद्र हुड्डा यांचे समर्थक तंवर यांच्याविरोधात नारेबाजी करू लागले. मात्र तंवर तरीही बोलले आणि भाषण पूर्ण केल्यावरच आपल्या जागी बसले. पंजाबचे प्रदेशाध्यक्ष प्रताप वाजवा यांनी आपल्या भाषणात लोकसभा खासदार अमरेंद्र सिंह यांना बंडखोर ठरवले. दोघांमधील मतभेद यानिमित्ताने समोर आले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Towards Modi's fight for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.