आधुनिकतेच्या नव्या टप्प्याकडे; अनेक बदल आणि अपेक्षांचे व्हिजन-२0२0
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 05:19 AM2020-01-01T05:19:38+5:302020-01-01T05:19:51+5:30
नव्या वर्षातील बदलांची सुरुवात नव्या संकल्पांनीच होत असते. आजपासून सुरू झालेले २0२0 तर अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे.
नव्या वर्षातील बदलांची सुरुवात नव्या संकल्पांनीच होत असते. आजपासून सुरू झालेले २0२0 तर अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, शेतीतील नवे प्रयोग, हवामानानुरूप शेतीचे नियोजन, डिजिटल आरोग्य सेवा, ई-कॉमर्समध्ये असलेल्या असंख्य संधी, अनेक सरकारी उपक्रमांचे खासगीकरण, येऊ घातलेली ५-जी सेवा, पर्यावरणपूरक वाहने, ड्रोनची नवनवी उड्डाणे, पर्यटनात होत असलेली वाढ, परदेशांत शिकायला जाणारे भारतीय विद्यार्थी आणि शिक्षणाचा हब बनत चाललेल्या भारतात शिकण्यासाठी येणारे परदेशी विद्यार्थी, ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे कमी होणारे चित्रपटगृहांचे महत्त्व, त्यासाठी तयार होणारे चित्रपट आणि वेबसीरिज अशा अनेक बाबी या वर्षांत अधिक ठसठशीत होतील. सोन्याच्या दराने आणि शेअर बाजाराने घेतलेली भरारी २0२0 मध्येही सुरूच राहणार आहे. हे होत असताना नव्या वर्षामध्ये शांतता आणि राजकीय सलोखा कायम राहावा, ही सर्वांचीच इच्छा असणार. आधुनिकतेच्या नव्या टप्प्यावर एकमेकांना शुभेच्छा देतानाच रोजगारनिर्मिती व वस्तूंना मागणी वाढावी आणि आर्थिक मंदीतून देश लवकरात लवकर बाहेर यावा, अशी प्रार्थना सर्वांनीच करू या!
नव्या वर्षात पदार्पण करताना पायाभूत सुविधांसाठी १00 लाख कोटींची गुंतवणूक योजना, रेल्वे दरात अगदी किरकोळ झालेली वाढ आणि अयोध्येतील वाद संपण्याचा अखेरचा टप्पा अशा बातम्या वाचायला मिळणार आहेत. मनोज नरवणे या मराठी माणसाने भारताचे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतल्याची बातमीही अशीच समाधानाची, मान ताठ करणारी.
गेला महिनाभर एनआरसी व सीएएवरून चाललेली हिंसक आंदोलने आणि त्यावरून गढूळ होत गेलेले वातावरण यांपासून सर्वांना सुटका हवी आहे. त्यावर वाद, चर्चा अवश्य व्हावी, पण तणाव नको, असेच प्रत्येकाला वाटत असणार. राजकीय व सामाजिक वाद सामोपचाराने सुटावेत आणि त्यातून कमालीच्या खालच्या पातळीवर होणारे आरोप थांबावेत, अशीही प्रत्येकाची इच्छा असणार. पण हे सारे चालत राहते. वर्ष बदलले म्हणून ते काही लगेच संपणार नाही.
मात्र त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे नव्या वर्षात आपण आधुनिकतेच्या आणखी वरच्या पायरीकडे जाणार आहोत. भारताला २0२५ पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविले आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षात हे बदल वेगाने व्हायलाच हवेत. त्यासाठी पहिल्या वर्षात नेमके काय बदल होणार, त्याचा आपल्याला काय फायदा होणार, कोणत्या बदलांमुळे देशाचे व जनतेचे भले होईल, याची सर्वांनाच उत्सुकता आहे आणि असेल.
सन २0२0 मध्ये भारताची व्हिजन काय आहे, यात प्रत्येकाला रस आहे. बुलेट ट्रेन, खासगी रेल्वेगाड्या, मेट्रो, लॅपटॉप, पामटॉम, मोबाइल, आर्टिफिशियल इंटलिजन्स, नवनवी गॅजेट्स, पर्यावरणपूरक वाहने, पेपरलेस आरोग्यसेवा, डिजिटल क्रांतीच्या दिशेने वाटचाल यांचा विचार २५/३0 वर्षांपूर्वी कोणाच्याही मनात आला नसता. पण तो पल्ला आपण सहज पार केला. आता पुढचा टप्पा काय आहे, याची उत्सुकता आहे.