संयुक्त किसान मोर्चाचा मोठा निर्णय; ट्रॅक्टर रॅलीत मार्ग बदलणाऱ्या दोन संघटनांवर कारवाई
By देवेश फडके | Published: February 7, 2021 03:12 PM2021-02-07T15:12:29+5:302021-02-07T15:16:43+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने मोठा निर्णय घेतला आहे.
सोनीपत : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने मोठा निर्णय घेतला आहे. नियोजित ट्रॅक्टर रॅलीचा मार्ग बदलून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या दोन संघटनांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, याविरोधात एक तपास समिती गठीत करण्यात आली आहे. (Two Farmers Organizations Suspended In Tractor Rally)
ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालात दोन संघटनांचे पदाधिकारी मार्ग बदलून दुसऱ्या ठिकाणी गेले. एवढेच नव्हे, तर या दोन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून मार्ग बदलला होता. शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी याबाबतीत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही, असेही या अहवालात म्हटले आहे.
सरकारने अहंकार सोडून कृषी कायदे रद्द करावेत; राहुल गांधींचा पुनरुच्चार
तपास समितीने दिलेल्या अहवालानंतर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांमध्ये चक्का जाम आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. चक्का जाम आंदोलनानंतर कुंडली सीमेवर सायंकाळी ३२ शेतकरी संघटनांपैकी १४ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर पंजाब किसान युनियनचे रुलदू सिंग मानसा, भाकियू क्रांतिकारीचे दर्शनपाल, जमहूरी किसानचे रघुवीर सिंगसह अन्य पदाधिकाऱ्यांनी चक्का जाम आंदोलनाच्या यशानंतर पुढील रणनीती आखण्याचा निर्णय घेतला आहे.
भाकियू क्रांतिकारीच्या सुरजित फूल गटाचे अध्यक्ष सुरजित सिंग फूल आणि आझाद शेतकरी समितीचे हरपाल सिंह सांगा या दोन पदाधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान जितक्या संघटनांनी मार्ग बदलला, त्या सर्वांविरोधात समिती तपास करणार आहे, अशी माहिती रुलदू सिंग मानसा यांनी दिली.
दरम्यान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांत चक्का जाम आंदोलनादरम्यान हिंसाचार घडवण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे या दोन राज्यात चक्का जाम आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. तसेच रणनीती बदलण्यापूर्वी संयुक्त किसान मोर्चाशी एकदा चर्चा करायला हवी होती, असेही राकेश टिकैत म्हणाले.