केवळ रुपयामध्ये किलोभर फळं-भाजी देणार हा व्यापारी
By admin | Published: February 21, 2017 03:29 PM2017-02-21T15:29:20+5:302017-02-21T15:33:13+5:30
28 फेब्रुवारी रोजी स्वस्त फळं-भाजीपाला खरेदीची अनोखी मोहीम राबवली जाणार आहे. यावेळी 1 रुपयात किलोभर ताजी फळं आणि भाजीपाला ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 21 - खानपूर येथील रायफल क्लब ग्राऊंडमध्ये 28 फेब्रुवारी रोजी अनोखी मोहीम राबवली जाणार आहे. यावेळी 1 रुपयात किलोभर ताजी फळं आणि भाजीपाला ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. हेल्पिंग हँड ही स्वयंसेवी संस्था आणि भाजीपाला विक्रेता परेश पटेल यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
जमालपूरमधील एपीएमसी मार्केटमध्ये पटेल यांचे भाजीपाल्याचे दुकान आहे. या मोहीमेबाबत त्यांनी सांगितले की, महागाईमुळे भाजीपाला आणि फळांची खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. या पार्श्वभूमीवर, गरिबांसाठी आगामी काळात हा कार्यक्रम शहरातील अन्य भागांमध्येही राबवणार असून या योजनेला आम्ही नियमित स्वरुप देऊ इच्छितो.
हेल्पिंग हँडचे सदस्य साजिद सईद यांनी सांगितले की, गरिबांसाठी हिरवा भाजीपाला आणि फळांची कमी किंमतीत विक्री करण्यासाठी 12 ट्रक फळ-भाजीपाल्याची ऑर्डर देण्यात आली आहे. प्रत्येकाला वितरणावेळी याचे एक पाकिट मिळेल.
पटेल यांनी असेही सांगितले की, 'फळ-भाजीपाल्याच्या या पाकिटात कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो, सफरचंद आणि केळे यांचा समावेश असेल.
फळ- भाजीपाल्याची खरेदी थेट शेतक-यांकडून केली जाईल. यामुळे शेतक-यांनाही त्यांच्या शेतमालाची योग्य किंमत मिळेल. दलालांसाठी होणा-या खर्चात कपात होईल. या उपक्रमाद्वारे होणा-या आर्थिक फायद्यातून निगम हॉस्पिटलला व्हेंटिलेटर देण्याचीही योजना आहे'. दरम्यान, पटेल यांच्या स्वस्त भाजीपाला विक्री उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.