देवाच्या नावे व्यापार करणाऱ्यांना कोर्ट पावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2015 02:00 AM2015-07-25T02:00:46+5:302015-07-25T02:00:46+5:30
‘या देशाकडे ३३ कोटी देव आहेत,’ असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यावसायिक लाभासाठी देवी-देवतांची नावे आणि प्रतिमांचा वापर करण्यावर प्रतिबंध
नवी दिल्ली : ‘या देशाकडे ३३ कोटी देव आहेत,’ असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यावसायिक लाभासाठी देवी-देवतांची नावे आणि प्रतिमांचा वापर करण्यावर प्रतिबंध घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.
‘हा लोकांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. लोकांना त्यांची श्रद्धा आणि विश्वास असलेल्या कोणत्याही देवी-देवतांच्या नावावर आपला व्यवसाय चालविण्यापासून रोखता येऊ शकत नाही,’ असे मत सर्वोच्च न्यायालयानेच व्यक्त केल्याने लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून देवाच्या नावांचा व प्रतिमांचा वापर करणाऱ्यांना जणू न्यायदेवता पावली आहे.
सरन्यायाधीश एच.एल. दत्तू आणि न्या. अरुण मिश्रा व न्या. अमिताव रॉय यांच्या पीठाने हा निकाल देतेवेळी असे स्पष्ट केले की,
‘एखादा व्यापारी आपल्या दुकानाचे नाव लक्ष्मी स्टोअर्स असे ठेवू शकतो. तो दुकानाला आपल्या लक्ष्मी नावाच्या कन्येचे नाव देऊ शकत नाही काय, एखाद्या व्यक्तीला त्याच्या दुकानाच्या पाटीवर किंवा उत्पादनावर कोणत्याही देवाची प्रतिमा लावण्यापासून का बरे रोखण्यात यावे, त्या देवाची पूजा करणे मला आवडते. मला ठरावीक देवाचे नाव आणि प्रतिमा ठेवावीशी वाटते. अन्य कुणी मला का रोखावे, असा प्रश्न या पीठाने अर्जदाराच्या वकिलाला विचारला.
‘भगवान बालाजीची भक्त असलेली व्यक्ती आपल्या मुलाचे नावही बालाजी ठेवू शकते आणि बालाजीच्याच नावावर आपला व्यापारही चालवू शकते.
तुम्ही लोकांच्या श्रद्धेशी संबंधित असलेला मुद्दा उपस्थित केलेला आहे. या देशाजवळ ३३ कोटी देव आहेत. सॉरी!’ असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आणि ही याचिका फेटाळून लावली. (लोकमत न्यूज नेटवर्क)