वाहतूकदारांचा संप मागे
By Admin | Published: October 6, 2015 05:23 AM2015-10-06T05:23:06+5:302015-10-06T05:23:06+5:30
पाच दिवसांपासून सुरू असलेला ट्रक वाहतूकदारांचा संप सोमवारी रात्री मागे घेण्यात आला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूकदारांच्या मागण्यांकडे लक्ष घालणार
नवी दिल्ली : पाच दिवसांपासून सुरू असलेला ट्रक वाहतूकदारांचा संप सोमवारी रात्री मागे घेण्यात आला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूकदारांच्या मागण्यांकडे लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. दिल्लीत ट्रक वाहतूकदारांची संघटना ‘एआयएमटीसी’च्या पदाधिकाऱ्यांसोबत गडकरी यांनी ३
तास चर्चा केल्यानंतर संपाची कोंडी फुटू शकली.
वाहतूकदारांच्या मागण्या विचारात घेण्यासाठी वाहतूक सचिव विजय छिब्बर यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या समितीत ट्रक वाहतूकदारांच्या प्रतिनिधींनाही स्थान देण्यात आले आहे. वाहतूकदारांच्या सर्व मागण्या या समितीसमोर ठेवण्यात येणार असून येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून ही समिती १५ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करेल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. वाहतूकदारांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत विचार केला जाईल.
मी त्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर त्यांनी सहमती दर्शविली आहे, असे गडकरी यांनी या बैठकीनंतर सांगितले. वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष भीम वाधवा यांनी लगेच संप मागे घेत असल्याची घोषणा केली.