नव्या नियमानुसार 23 हजारांचे चलन फाडले; स्कूटी मालकाने पोलिसांना असे काही सांगितले की....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 05:07 PM2019-09-03T17:07:31+5:302019-09-03T19:03:56+5:30
दिल्लीच्या गीता कॉलनीमध्ये राहणाऱ्या दिनेश मदान यांच्याबाबत हा किस्सा घडला आहे.
नवी दिल्ली : 1 सप्टेंबरपासून पाच राज्ये वगळता अन्य राज्यांमध्ये नवीन वाहतुकीचे नियम लागू झाले आहेत. यामध्ये अव्वाच्या सव्वा दंड आकारला जात आहे. एकट्या दिल्ली पोलिसांनीच पहिल्या दिवशी तब्बल 4 हजार चलन फाडली आहेत. आता हरियाणाच्या गुरगावमधून एक घटना समोर येत आहे. पोलिसांनी स्कूटी चालकाला चक्क 23 हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच त्याची स्कूटीही जप्त केली आहे. ही पावती सोशल मिडीयावर कमालीची व्हायरल होत आहे.
दिल्लीच्या गीता कॉलनीमध्ये राहणाऱ्या दिनेश मदान यांच्याबाबत हा किस्सा घडला आहे. मदान हे सोमवारी काही कामानिमित्त गुरगावला स्कूटीवरून गेले होते. जिल्हा न्यायालय इमारतीच्या समोरील सर्व्हिस रोडवर त्यांनी हेल्मेट काढले. तेथील पोलिसांनी मदान यांच्याकडे गाडीचे कागदपत्र मागितले. कागदपत्र नसल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या हाती 23 हजार रुपयांचे चलन थोपविले.
मदान यांच्याकडे या स्कूटीचे आरसी, चालक परवाना, पीयूसी, विमा आदींपैकी एकही कागदपत्र नव्हते. यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर पाच नियम तोडल्याप्रकरणी एवढ्या रुपयांचे चलन फाडले. एकीकडे पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे. कारण मदान यांच्याकडे चालक परवाना, विमा आणि आरसी या महत्वाच्या कागदपत्रांपैकी एकही कागदपत्र नव्हते. अशामध्ये जर काही अपघात, गुन्हा घडला असता तर धोक्याचे होते. पीयूसी, हेल्मेटचा एवढा मोठा तोटा झाला नसता. मात्र, महत्वाची कागदपत्रे नसल्याने सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. बॉम्बस्फोट, दहशतवादी कारवायांसाठी अशाच प्रकारची वाहने वापरली जातात. यामुळे पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच होती. मात्र, खरी बाजू पुढे समोर आली आहे.
दिनेश मदान यांची स्कूटी पोलिसांनी जप्त केली आहे. यामुळे त्यांना ही स्कूटी न्यायालयात हजर राहून सोडवावी लागणार आहे. तसेच जामीनही द्यावा लागेल. यासाठीचा खर्च आणि वेळ जास्त आहे. मात्र, मदान यांनी पोलिसांना सांगितले की, स्कूटर खूप जुनी आहे. यामुळे तिची किंमत तुमच्या चलनाच्या किंमतीएवढीही भरत नाही. तिला बाजारात विकायला गेल्यास फारतर 15 हजार रुपये मिळतील.
या आतबट्ट्याच्या गणितामुळे मदान ती स्कूटी सोडविण्यासाठी जाणार नसल्याचे सांगत होते. असे झाल्यास पोलिसांना ही स्कूटी काही वर्षे सडवत ठेवून भंगारातच काढावी लागणार आहे. याशिवाय मदान यांची कागदपत्रेच नसल्याने दंडही वसुलता येणार नाही.
Dinesh Madan: Value of my scooty is around 15,000.I even got a copy of RC on WhatsApp from home but by then he had printed.The amount could have been less if he had waited for a while. I want that fine should be relaxed. From now on I will always carry my documents. https://t.co/dJo5BeIcGD
— ANI (@ANI) September 3, 2019
मात्र, मदान यांनी नंतर एनआयला सांगितले की, हा दंड कमी झाल्यास चांगले होईल. मी दंड कमी होण्याची वाट पाहत आहे. पकडल्यानंतर घरातून लगेचच मी आरसी कॉपी व्हॉट्सअॅपवर मागविली होती. थोडी वाट पाहिल्यास दंड कमी होण्याची आशा आहे. यापुढे मी कागदपत्रे सोबत ठेवेन.