वाहतूक पोलिसाने अडवली होती मोदींची गाडी
By admin | Published: January 6, 2017 05:17 PM2017-01-06T17:17:49+5:302017-01-06T17:17:49+5:30
देशाच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्याबद्दलचा एक किस्सा आजही अनेकांच्या आठवणीत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - देशाच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्याबद्दलचा एक किस्सा आजही अनेकांच्या आठवणीत आहे. किरण बेदी डयुटीवर तैनात असताना त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची गाडी अडवून दंड आकारला होता. अशीच एक घटना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत घडली होती.
ज्यावेळी एका वाहतूक पोलिसाने मोदींची गाडी रोखली होती. त्यावेळी मोदी पंतप्रधान नव्हते. ते भाजपाचे प्रभारी होते. मोदी आपल्या गाडीतून भोपाळला चालले होते त्यावेळी वाहतूक पोलिसाने त्यांची गाडी रोखली. 1998 मध्ये मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या. तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सभेसाठी आले होते. मोदीही त्या सभेला आले होते.
भोपाळ विमानतळावरुन भाजपा कार्यालयाच्या गाडीत बसून मोदी निघाले. हमीदिया रुग्णालयाजवळ एका वाहतूक पोलिसाने मोदींची गाडी अडवली. थोडयाच वेळात तिथून दिग्विजय सिंह यांच्या गाडयांचा ताफा जाणार होते. त्यावेळी दिग्विजय मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते.
मोदींची गाडी अडवल्यानंतर ड्रायव्हरने गाडीत भाजपाचे प्रभारी असल्याची माहिती दिली. पण त्याचा वाहतूक पोलिसावर काहीही परिणाम झाला नाही. त्याने गाडी सोडली नाही. मुख्यमंत्र्यांची गाडी त्या रस्त्यावरुन गेल्यानंतरच त्याने मोदींची गाडी सोडली. खरतर मोदींनी यावर राग, संताप व्यक्त करायला हवा होता पण उलट मोदींनी कर्तव्यात कुठलीही कसूर न ठेवल्याबद्दल त्या पोलिसाचे कौतुक केले.