वर्दीतील माणुसकी! गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार, नोकरी सांभाळून देतोय शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 05:27 PM2022-04-15T17:27:03+5:302022-04-15T17:36:25+5:30

एक वाहतूक पोलीस आपल्या कर्तव्यादरम्यान रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या मुलाला चांगल्या सरकारी शाळेत प्रवेश मिळावा म्हणून शिकवत आहे. 

traffic police turns teacher for poor child wins people heart with gesture | वर्दीतील माणुसकी! गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार, नोकरी सांभाळून देतोय शिक्षण

वर्दीतील माणुसकी! गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार, नोकरी सांभाळून देतोय शिक्षण

Next

नवी दिल्ली - आजच्या काळात लोकांना स्वतःच्या फायद्याशिवाय कशाचीच पर्वा नाही. लहानसहान कामातही त्यांचा फायदा दिसत नाही तोपर्यंत ते करत नाहीत, अशावेळी कोणी निस्वार्थीपणे गरजूंना मदत केली तर खरच नवल. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. जगात असे अनेक लोक आहेत जे इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. कोलकाता पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केलेली एक गोष्ट प्रेरणा देत आहे. एक वाहतूक पोलीस आपल्या कर्तव्यादरम्यान रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या मुलाला चांगल्या सरकारी शाळेत प्रवेश मिळावा म्हणून शिकवत आहे. 

कोलकाता पोलिसांनी फेसबुकवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये रस्त्याच्या कडेला बसलेल्या मुलासमोर उभा असलेले वाहतूक पोलीस त्याला शिकवताना दिसत आहे. हे वाहतूक पोलीस बल्लीगंज आयटीआयजवळ ड्युटी करतात. अनेक दिवसांपासून ते आठ वर्षाच्या मुलाला रस्त्याच्या कडेला खेळताना पाहत होते. मुलाच्या आईशी बोलले तेव्हा कळले की पैशांअभावी मुलाला पुढे शिकता येत नाही, अभ्यास करता येत नाही. अशा परिस्थितीत पोलिसांनी त्याला मदत करण्याचे ठरवले.

मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा आपल्या आईसोबत फुटपाथवर राहतो. तो तिसरीचा विद्यार्थी आहे पण त्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळत नाही. प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी महिलेकडे पैसे नव्हते. हे समजल्यानंतर सार्जंट घोष यांनी मुलाला शिकवण्याची जबाबदारी घेतली. कर्तव्य बजावत असताना ते आधी रस्त्याची वाहतूक सुरळीत करतात, मग बाजूला येऊन मुलाला शिकवतात.

मुलाला शिकवल्यानंतर त्याला गृहपाठ दिला जातो. सार्जंट घोष केवळ त्याचा अभ्यासच नाही तर त्याच्या हस्ताक्षरात आणि उच्चारातही सुधारणा करून घेत आहेत. कोलकाता पोलिसांनी ही पोस्ट फेसबुकवर शेअर केल्यावर लोकांनी पोलिसांचे भरभरून कौतुक करायला सुरुवात केली. आजच्या काळात आपल्या कर्तव्यातून वेळ काढून गरीब मुलाला मदत करणारा क्वचितच दिसतो. अशा परिस्थितीत अनेक लोक सार्जंटचे कौतुक करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: traffic police turns teacher for poor child wins people heart with gesture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.