आपुले मरण पाहिले म्या डोळा; रोप वेवर अडकलेल्या पर्यटकांची आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 01:21 PM2022-04-13T13:21:17+5:302022-04-13T13:21:53+5:30

झारखंडमधील रोप वेवर अडकून पडलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात आली असून, त्यांचे अनुभव ऐकून लोक स्तब्ध होत आहेत. पर्यटक सौरभ यांनी सांगितले की, आम्हाला जगण्याची शाश्वती नव्हती.

Tragedy of tourists stranded on the ropeway accident in jharkhand | आपुले मरण पाहिले म्या डोळा; रोप वेवर अडकलेल्या पर्यटकांची आपबीती

आपुले मरण पाहिले म्या डोळा; रोप वेवर अडकलेल्या पर्यटकांची आपबीती

googlenewsNext

एस. पी. सिन्हा

देवघर (झारखंड) :

झारखंडमधील रोप वेवर अडकून पडलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात आली असून, त्यांचे अनुभव ऐकून लोक स्तब्ध होत आहेत. पर्यटक सौरभ यांनी सांगितले की, आम्हाला जगण्याची शाश्वती नव्हती. परंतु संरक्षण दलाने वाचविले. प्रचंड उष्म्यामुळे हैराण होतो. अनेकांचा घसा तर तहानेने कोरडा पडला होता. काहींनी शिवांबू पिऊन आपले प्राण वाचविले.

दुपारी ४.३२ झालेले होते. मी, आई-वडील, सासरे व पुतण्यासह रोप वेमध्ये बसलेलो होतो. मात्र ट्रॉलीवर २४ तास तहान-भुकेने व्याकूळ होऊन काढावे लागले. रात्री भीतीने झोपही आली नाही. प्रचंड उष्मा असल्यामुळे घसा कोरडा पडला होता. परंतु काहीच उपाय नसल्यामुळे बाबा बासुकीनाथ यांचे स्मरण करीत होते, हा थरारक अनुभव सांगताना सौरभ भेदरलेल्या अवस्थेत होता. आपुले मरण पाहिले म्या डोळा, अशी अनेकांची परिस्थिती होती.

अन्य एक पर्यटक नीरजने सांगितले की, रोप वे सुरू होताच झटके बसू लागले. एक मोठा आवाज झाला व ट्रॉली थांबली. पर्वतावर पोहोचताच हवेत ट्रॉली हलू लागली व आम्ही खाली पडणार असे वाटू लागले. आम्ही सर्वात आधी टूरिस्ट बसच्या एजंटशी मोबाईलवर संपर्क साधला. तो पर्वताच्या खाली आमची वाट पाहत होता. त्याला कळाले होते की रोप वेचा रोलर तुटला आहे. सलग २४ तास आम्ही श्वास रोखून जीवन-मरणाच्या सीमारेषेवर बसलो होतो.
अन्य ट्रॉलीमध्ये अडकलेले लोक वाचवा-वाचवा म्हणून ओरडत होते. कोणी पाणी-पाणी म्हणत होता. 

रोप-वेवर अडकलेल्या सर्वांची सुटका
-    झारखंडमधील त्रिकूट पर्वतावर रोप-वेमध्ये अडकलेल्या सर्व ४६ जणांची तिसऱ्या दिवशी सुटका करण्यात आली. मंगळवारी दुपारी एअरलिफ्ट करताना एक महिला दीड हजार फूट खाली कोसळली. 
-    तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार, बचाव करताना कोसळलेल्या शोभा देवी साह यांचा श्वासोच्छ्वास सुरू आहे. ही महिला देवघरची आहे.
-    दरम्यान, सोमवारी मृत पावलेल्या राकेश यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी आक्रोश करून रास्ता रोको केला. 

आई गमावली
गिरिडीहचे रहिवासी गोविंद यांनी सांगितले की, रोप वेबाबत खूप ऐकले होते. याचा आनंद लुटण्यासाठी ट्रॉलीमध्ये चढलो. पर्वतावर फिरून खाली येताना ट्रॉली कशाला तरी धडकली. यात आम्ही सर्वजण जखमी झालो. 

बचाव करताना आई सुमंतीदेवी यांचे निधन झाले. माझ्या पत्नीचा जबडा व पायाला गंभीर जखम झाली. मुलीच्या पायाचे हाड तुटले. दीड वर्षांचा मुलगा आनंद याची तब्येत गंभीर आहे. त्याचा संपूर्ण जबडा तुटला आहे. अशा प्रकारे पर्यटकांनी आपबीती सांगितली.

Web Title: Tragedy of tourists stranded on the ropeway accident in jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.