सर्वात वेगवान 'ट्रेन 18'चे नामकरण; जाणून घ्या नवीन नाव...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 10:06 AM2019-01-28T10:06:13+5:302019-01-28T10:07:19+5:30
'ट्रेन 18' या रेल्वेला 'वंदे भारत एक्स्प्रेस', असे नाव देण्यात आले आहे. याबाबतची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.
नवी दिल्ली : 'ट्रेन 18' या रेल्वेला 'वंदे भारत एक्स्प्रेस', असे नाव देण्यात आले आहे. याबाबतची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, "ट्रेन 18 ची डिजाईन आणि निर्मिती भारतात केली आहे. लवकरच ही ट्रेन लोकांच्या सेवेसाठी रुळावर धावणार आहे. या ट्रेनसाठी लोकांनी अनेक नावे सुचवली होती. परंतु आम्ही 'वंदे भारत एक्स्प्रेस' या नावावर शिक्कामोर्तब केले आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच या रेल्वेला हिरवा कंदील दाखवणार आहेत. त्यानंतर 'वंदे भारत एक्स्प्रेस' दिल्ली ते वाराणसी धावणार आहे. ही रेल्वे 160 किमी प्रति तास इतक्या वेगाने धावेल. ही भारतातील पहिली इंजिन नसलेली रेल्वे असून पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. ही ट्रेन मेक इन इंडियाचे एक उत्तम उदाहरण आहे.
तसेच, ही रेल्वे पूर्णपणे वातानुकूलित असून त्यामध्ये 16 कोच आहेत. एका कोचमध्ये 128 लोक बसतील अशा आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
देशी बनावटीची हायस्पीड 'ट्रेन 18'
कोटा ते सवाई माधोपूर या भागात ट्रेन 18 ची चाचणी घेण्यात आली. सध्याच्या घडीला गतीमान एक्स्प्रेस ही देशातील सर्वात वेगाने धावणारी ट्रेन आहे. या ट्रेनचा वेग 160 किलोमीटर प्रति तास इतका आहे. ही ट्रेन आग्रा ते दिल्ली दरम्यान धावते. मात्र ट्रेन 18 ने गतीमान एक्स्प्रेसला मागे टाकले. ट्रेन 18 ची निर्मिती मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात आली आहे. या ट्रेनची तांत्रिक चाचणी मुरादाबाद ते बरेली दरम्यान घेण्यात आली होती. या चाचणीत ही ट्रेन उत्तीर्ण झाली होती.