अग्निपथ योजनेवरून छपरा येथे ट्रेन जाळली, आरामध्ये अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 12:10 PM2022-06-16T12:10:45+5:302022-06-16T12:16:44+5:30
Agnipath recruitment scheme protests :आंदोलक उमेदवार कोणाचेही ऐकायला तयार नाहीत. छपरामध्येही उमेदवारांनी गदारोळ केला आहे. आंदोलक हिंसक झाले असून ट्रेन सुद्धा जाळण्यात आली आहे.
पाटणा : लष्कर भरतीसाठी आणलेल्या नवीन अग्निपथ योजनेबाबत कालपासून सुरू झालेला गदारोळ आजही कायम आहे. आज जेहानाबाद आणि नवादा येथे सेना उमेदवार रस्त्यावर उतरले आहेत. आरा रेल्वे स्थानकावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गोंधळ आणि तोडफोड केली. यादरम्यान आंदोलक रेल्वे ट्रॅकशिवाय फलाटावरही चढले. आरा स्थानकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलक उमेदवार कोणाचेही ऐकायला तयार नाहीत. छपरामध्येही उमेदवारांनी गदारोळ केला आहे. आंदोलक हिंसक झाले असून ट्रेन सुद्धा जाळण्यात आली आहे.
सैन्यात तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये तरुणांकडून जोरदार विरोध सुरू झाला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत.
बिहारमध्ये आंदोलकांनी बक्सरमध्ये रेल्वे ट्रॅक जाम केला, तर मुझफ्फरपूरमधील मादीपूरमध्ये आग लावून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय आरा येथेही मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिसांनी तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते आंदोलक भरती योजना मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत.