विमानाप्रमाणे ट्रेनमध्ये आता रेल्वे सुंदरी
By admin | Published: February 21, 2016 01:35 PM2016-02-21T13:35:38+5:302016-02-21T13:57:43+5:30
तुम्ही विमान प्रवास करता त्यावेळी हवाई सुंदरी स्मितहास्याने तुमचे स्वागत करते, तुमचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सीटबेल्ट बांधण्यापासून वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करते.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१- तुम्ही विमान प्रवास करता त्यावेळी हवाई सुंदरी स्मितहास्याने तुमचे स्वागत करते, तुमचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सीटबेल्ट बांधण्यापासून वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करते. असाच अनुभव रेल्वे प्रवासात आला तर.
लवकरच ही कल्पना प्रत्यक्षात येणार आहे. ट्रेनमध्ये बसल्यानंतर रेल्वे सुंदरी स्मितहास्य आणि गुलाब पुष्पाने तुमचे स्वागत करेल. त्यावेळी ट्रेनमध्ये कानाला सुखावणारे सुंदर संगीत चालू असेल. दिल्ली-आग्रा मार्गावर धावणा-या गतिमान एक्सप्रेसमध्ये (ट्रेन होस्टेस) रेल्वे सुंदरींची नियुक्ती करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
या सुंदरी प्रवाशांचे स्वागत गुलाबाच्या पुष्पाने करणार आहेत. १६० कि.मी.वेगाने धावणारी भारताची ही पहिली रेल्वे आहे. २५ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू देशातील या पहिल्या सेमी-हायस्पीड ट्रेनच्या वैशिष्ट्यांची घोषणा करणार आहेत.
या ट्रेनमध्ये हायपावर इर्मजन्सी ब्रेकिंग सिस्टीम आहे. त्याशिवाय आगीची माहिती देणारी अत्याधुनिक यंत्रणा, जीपीएस आणि लाईव्ह माहितीसाठी टीव्ही सुध्दा असेल. विमानसेवेप्रमाणे गतिमान एक्सप्रेसमध्ये सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
विमानाच्या दर्जाचे अन्न या ट्रेनमध्ये मिळणार असून, शताब्दी एक्सप्रेसपेक्षा या ट्रेनचे तिकीट २५ टक्के जास्त असेल अशी सूत्रांची माहिती आहे.