रेल्वेच देणार अन्य पर्याय
By admin | Published: September 26, 2015 03:00 AM2015-09-26T03:00:28+5:302015-09-26T03:00:28+5:30
आपले प्रवासी, ग्राहक अन्य पर्यायांकडे जाण्यापासून रोखण्याचा भाग म्हणून ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीम’ (क्रिस) चा रेल्वे बुकिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचा प्रयोग सध्या चालू आहे.
नवी दिल्ली : आपले प्रवासी, ग्राहक अन्य पर्यायांकडे जाण्यापासून रोखण्याचा भाग म्हणून ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीम’ (क्रिस) चा रेल्वे बुकिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचा प्रयोग सध्या चालू आहे. हव्या त्या गाडीचे आणि वर्गाचे आरक्षण उपलब्ध नसल्यास अन्य गाड्यांचे पर्याय सुचविणारी ही प्रणाली महिनाभरात कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत. शिवाय रेल्वेच्या प्रवासी भाड्याच्या उत्पन्नातही किमान १५ ते २0 टक्क्यांची वाढ नव्या सॉफ्टवेअरमुळे होण्याची अपेक्षा आहे.
इंटरनेटवर रेल्वे प्रवासाचे आरक्षण करताना हवे ते तिकीट मिळाले नाही, तर ही वेबसाइट यापुढे तुम्हाला विविध पर्याय सुचवणार आहे.
त्याच ट्रेनच्या इतर वर्गात जागा उपलब्ध असेल तर तो पहिला पर्याय अन्यथा दुसरी ट्रेन अथवा जवळपासच्या रेल्वे स्थानकांचे पर्याय सुचवणारी खिडकीही त्याच साइटवर उघडेल. रेल्वेचे बहुसंख्य प्रवासी वेटिंग लिस्टचा धोका पत्करू इच्छित नाहीत. कन्फर्म तिकीट मिळाले नाही तर
त्याच प्रवासासाठी ते दुसरी साधने शोधतात. अनेक प्रवाशांना फक्त लोकप्रिय ट्रेन्सच माहीत असतात.
त्याच रूटवर अन्य ट्रेन्समध्ये जागा उपलब्ध असल्या तरी त्याची त्यांना कल्पना नसते. सध्या रेल्वे प्रवासाचे आरक्षण करण्यासाठी प्रत्येक ट्रेनची
आरक्षण स्थिती स्वतंत्रपणे शोधावी लागते. नव्या व्यवस्थेत प्रवाशांचा
हा त्रास वाचणार आहे.
रेल्वे बोर्डाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार नवी व्यवस्था लागू करण्यासाठी रेल्वेच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचा ९0 टक्के भाग
क्रिसने पूर्ण केला असून,
किरकोळ स्वरूपाचे काम बाकी आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)