रेल्वे रुळाची होते पूजा
By admin | Published: April 30, 2017 12:44 AM2017-04-30T00:44:21+5:302017-04-30T00:44:21+5:30
लोक मंदिर, तीर्थस्थळी जाऊन पूजापाठ करताना तुम्ही पाहिले असेल; परंतु पाटणा येथील बाढ भागात रहाणाऱ्या महिला दररोज रेल्वेरुळाची पूजा करतात.
लोक मंदिर, तीर्थस्थळी जाऊन पूजापाठ करताना तुम्ही पाहिले असेल; परंतु पाटणा येथील बाढ भागात रहाणाऱ्या महिला दररोज रेल्वेरुळाची पूजा करतात. ऐकून तुम्हाला विचित्र वाटत असेल; परंतु हे सत्य आहे. पाटण्याजवळ मिल्कीचक आणि सरवरपूर ही दोन गावे आहेत. ही गावे समोरासमोर असून, त्यांच्या मधून पाटणा-कोलकाता रेल्वेमार्ग जातो. या गावांतील महिला दररोज पूजेसाठी जवळच्या मंदिरात जातात आणि परतताना रेल्वे रुळावर येऊन पुन्हा पूजा करतात. रेल्वे रुळाची पूजा करण्याचे कारण काय, असे तुम्हाला वाटेल. दोन्ही गावांमधून जाणाऱ्या रेल्वे रुळावर पूर्वी फाटक होते. मात्र या फाटकाची दुर्दशा होत गेली आणि आज तेथे फाटक नावालाही शिल्लक नाही. दोन्ही गावच्या लोकांना दररोज रेल्वे रूळ ओलांडावा लागतो. शाळकरी मुलेही दररोज हा रूळ ओलांडून शाळेला जातात. दरवर्षी रूळ ओलांडताना दोन्ही गावांतील अर्धा डझन लोकांचा मृत्यू होतो. येथे फाटक लावण्यासाठी दोन्ही गावच्या लोकांनी अनेक प्रयत्न करूनही समस्या सुटली नाही. प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्यामुळे लोकांना वाटले की, आता केवळ ईश्वरच तारणहार आहे. त्यामुळेच गावातील महिला कुटुंब आणि मुलांच्या क्षेमकुशलतेसाठी दररोज या रेल्वे रुळाची पूजा करतात.