बेळगावमध्ये जवानांना दहशतवादाशी लढण्याचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 04:58 AM2017-12-30T04:58:31+5:302017-12-30T04:59:04+5:30
बेळगाव : पारंपरिक युद्धाऐवजी आज लष्कराला बंडखोरी, दहशतवाद, घुसखोरी आणि नक्षलवाद या देशांतर्गत प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे.
निनाद देशमुख
बेळगाव : पारंपरिक युद्धाऐवजी आज लष्कराला बंडखोरी, दहशतवाद, घुसखोरी आणि नक्षलवाद या देशांतर्गत प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी त्यांना आधुनिक प्रशिक्षणाची गरज आहे. बेळगावजवळील रोहिडेश्वर येथे असे प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक सुविधांबरोबरच सीमेवरील भौगोलिक परिस्थितीचे प्रारूपही तयार करण्यात आले आहे, अशी माहिती बेळगाव येथील मराठा लाइट इन्फन्ट्रीचे कमांडिंग आॅफिसर ब्रिगेडियर गोविंद कलवड यांनी दिली.
मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या जवानांना देण्यात येणाºया प्रशिक्षणादरम्यान आयोजित प्रात्यक्षिक कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ब्रिगेडियर कलवड पुढे म्हणाले की, सीमावर्ती भागातील परिस्थितीचा विचार करून मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये जवानांना मूलभूत प्रशिक्षणासोबतच अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जात आहे. मराठा लाइट इन्फन्ट्रीमधील जवानांसोबत राष्ट्रीय रायफल्समध्ये भरती होणाºया जवानांना, तसेच मित्र देशांतील सैनिकांनाही या ठिकाणी ३४ आठवड्यांचे प्रशिक्षण देत आहे.
>दहशतवादविरोधी कारवाईचे प्रात्यक्षिक
दहशतवादाविरोधात कशा पद्धतीने कारवाई केली जाते, याचे प्रात्यक्षिक या वेळी दाखवण्यात आले. डोंगराळ भागांत घरामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे जवानांची एक तुकडी खाली उतरली. लष्करी डावपेच आखत समन्वय साधत या दहशतवाद्यांचा खात्मा जवानांनी केला.
>माजी सैनिक मेळावा
बेळगाव येथील मराठा लाइट इन्फन्ट्रीला २०१८ मध्ये २५० वर्षे पूर्ण होत आहेत. हे वर्ष साजरे करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात निवृत्त अधिकारी आणि जवानांसाठी पेन्शन अदालत, माजी सैनिक मेळावा, हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान, असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.