'PFI मध्ये RSS प्रमाणे ट्रेनिंग दिली जाते' पाटणा SSP च्या वक्तव्याने नवा वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 07:17 PM2022-07-14T19:17:03+5:302022-07-14T19:18:11+5:30
पाटण्याचे एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लन यांनी पीएफआयची आरएसएसशी तुलना केल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.
पाटणा: बिहारची राजधानी पाटण्याचे एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लन यांनी पीएफआयची(PFI) आरएसएसशी(RSS) तुलना केल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. एसएसपी म्हणाले की, 'ज्याप्रकारे आरएसएसच्या शाखेत स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाते, त्याचप्रमाणे पीएफआय आपल्या लोकांना प्रशिक्षण देते.' त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपने नाराजी व्यक्त केली असून, ढिल्लन यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
एसएसपीच्या वक्तव्यावर भाजप नाराज
आरएसएसची पीएफआयशी तुलना करण्यावरुन भाजपचे प्रवक्ते अरविंद कुमार सिंह म्हणाले की, पाटणाचे एसएसपी पीएफआयच्या प्रवक्त्यासारखे बोलत आहेत. त्यांना एसएसपी पदावरून हटवण्यात यावे. भाजपचे फायरब्रँड नेते आणि आमदार हरीश भूषण ठाकूर म्हणाले की, एसएसपीच्या वक्तव्यातून त्यांची मानसिक दिवाळखोरी दिसून येते. त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल तात्काळ माफी मागावी अन्यथा सरकारने त्यांना बडतर्फ करावे.
एसएसपीच्या समर्थनार्थ आरजेडी आणि एचएएम
राजदने पाटणा एसएसपीच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. आरजेडी पाटणा यांनी ट्विट केले की, हे लोक शारीरिक प्रशिक्षणाच्या नावाखाली आपला प्रचार आणि द्वेष पसरवतात. या संघाच्या कार्यपद्धतीबद्दल पाटण्याचे एसएसपी अगदी बरोबर बोलले आहेत. ते दंगल, मॉब लिंचिंग आणि इतर घटना घडवून आणतात. त्यांची लोक सामाजिक सलोखाविरोधी कृत्ये करतात.
दुसरीकडे, एचएएमचे प्रवक्ते डॉ. दानिश रिझवान म्हणाले की, एसएसपीला जाणीवपूर्वक वादात ओढले जात आहे. इस्लामिक स्टेटबद्दल बोलणे हा गुन्हा असेल, तर हिंदु राष्ट्राची वकिली करणे योग्य आहे का? इस्लामिक राष्ट्राची संकल्पना मांडणाऱ्यांना तुरुंगात टाकले जाते, तर मग हिंदू राष्ट्राच्या गप्पा मारणाऱ्यांना मुक्त सोडले जाते.