‘एनडीआरएफ’ अकादमीत सार्क देशांनाही प्रशिक्षण- अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 03:47 AM2020-01-03T03:47:55+5:302020-01-03T03:48:28+5:30

नागपुरातील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय देशाला केले समर्पित

Training for SAARC countries in 'NDRF' Academy | ‘एनडीआरएफ’ अकादमीत सार्क देशांनाही प्रशिक्षण- अमित शहा

‘एनडीआरएफ’ अकादमीत सार्क देशांनाही प्रशिक्षण- अमित शहा

Next

नागपूर : नागपुरात भव्य व अत्याधुनिक अशी एनडीआरएफची (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) अकादमी उभारण्यात येत आहे. ही आशिया खंडातील एकमेव अशी अकादमी आहे. या अकादमीमध्ये दक्षिण आशियातील सार्क देशांमधील नागरिकांनाही अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाईल, त्यामुळे ती सार्क देशांसाठीही फायद्याची ठरेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे व्यक्त केला.

राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयातील नवनिर्मित परिसर गुरुवारी राष्ट्राला समर्पित व एनडीआरएफ अकादमीची स्थापना करताना ते बोलत होते. यावेळी अग्निशमन शौर्य पदकांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, उपस्थित होते.

अमित शहा म्हणाले, सध्या अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण झाली आहे. अलीकडे देशात तीन मोठ्या नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडल्या. यात लोकांचे जीव आणि संपत्तीच्या संरक्षणात एनडीआरएफने महत्त्वाची भूमिका बजावली. पूर्वी अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये १० हजारावर लोकांचे बळी जात होते. परंतु आता तसे राहिले नाही. कुठेही नैसर्गिक आपत्ती आल्यास एनडीआरएफ तात्काळ पोहोचते. हे काम केवळ चार वर्षात झाले हे विशेष. आपत्ती निवारण आणि अग्निशमन विभाग हे दोन्ही विभाग गेली ७० वर्षे दुर्लक्षित राहिले. अग्निशमन हा राज्यांचा विषय आहे. राज्यांनीही तो महापालिकेच्या भरवशावर ठेवला. त्यामुळे हे विभाग कायमस्वरुपी दुर्लक्षित राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये या दोन्ही विभागाला मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला. केवळ चार वर्षात एनडीआरएफ देशभरात पसरले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले,आंतरिक व बाह्य सुरक्षेसोबतच जानमालाची सुरक्षाही महत्त्वाची आहे. हेच कार्य अग्निशमन विभाग व एनडीआरएफ करते.

पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
अमित शहा यांनी सांगितले की, पुढील पाच वर्षात ५ ट्रिलियन डॉलरवर अर्थव्यवस्था नेऊन जगात ती १ ते ३ क्रमांकापर्यंत पोहोचवण्याचे आमचे लक्ष्य आहे.
नागपुरातील राष्ट्रीय अग्नीशमन सेवा महाविद्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण व एनडीआरएफ अकादमीचे भूमीपूजनप्रसंगी दीप प्रज्वलित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. सोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवर.

Web Title: Training for SAARC countries in 'NDRF' Academy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.