रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचे हस्तांतर करण्यास मुभा
By Admin | Published: October 20, 2015 03:52 AM2015-10-20T03:52:35+5:302015-10-20T03:52:35+5:30
जेथे रक्ताचा तुटवडा आहे अशा ठिकाणी ते उपलब्ध होऊन गरजू रुग्णांचे प्राण वाचावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका रक्तपेढीतून दुसऱ्या रक्तपेढीत रक्ताचे
नवी दिल्ली : जेथे रक्ताचा तुटवडा आहे अशा ठिकाणी ते उपलब्ध होऊन गरजू रुग्णांचे प्राण वाचावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका रक्तपेढीतून दुसऱ्या रक्तपेढीत रक्ताचे हस्तांतर करण्यास मुभा दिली आहे.
रक्तघटकांपासून तयार केल्या जाणाऱ्या जीवरक्षक औषधांची उपलब्धता वाढावी यासाठी रक्तपेढ्यांकडे उपलब्ध असलेल्या अतिरिक्त प्लाझ्माची वस्तुविनिमयाच्या स्वरूपात अदलाबदल करण्यासही मंत्रालयाने मुभा दिली असून अशा अदलाबदलीसाठी प्लाझ्माचे मानीव मूल्यही निर्धारित केले आहे.
मंत्रालयाने म्हटले की, रक्त आणि रक्त घटकांपासून तयार केल्या जाणाऱ्या जीवरक्षक औषधांची उपलब्धता वाढावी व ती गरज असेल तेथे वेळेवर उपलब्ध व्हावीत यासाठी हे दोन्ही उपाय योजण्यात येत आहेत. ‘नॅशनल ब्लड ट्रान्स्फ्युजन कौन्सिल’च्या शिफारशींनुसार हे निर्णय घेण्यात आले आहेत. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचे आपसात हस्तांतर करण्यास प्रथमच परवानगी देण्यात आली असून त्यासाठी रक्ताचे हस्तांतर सुरक्षितपणे व तत्परतेने कसे केले जावे याची सविस्तर मार्गदर्शिकाही जारी करण्यात आली आहे. मंत्रालयाने असेही स्पष्ट केले की, देशातील काही रक्तपेढ्यांमध्ये प्रसंगी अतिरिक्त रक्त प्लाझ्मा उपलब्ध असतो; परंतु त्याची विल्हेवाट कशी लावावी यासाठी यापूर्वी कोणतेही नियम नसल्याने रक्तपेढ्या अशा अतिरिक्त प्लाझ्माचा व्यापार करीत असत; मात्र आता यासाठीही निश्चित पद्धत ठरवून देण्यात आली आहे. यासाठी प्रति लिटर प्लाझ्मासाठी १,६०० रुपये असे मानीव अदलाबदल मूल्य निश्चित करण्यात आले आहे; मात्र रक्तपेढ्या अतिरिक्त प्लाझ्मा रोखीने विकू शकणार नाहीत. प्लाझ्मा देऊन रक्तपेढ्या त्या बदल्यात गरजेनुसार नित्यवापराची सामग्री, उपकरणे किंवा प्लाझ्मापासून तयार केलेली उत्पादने घेऊ शकतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)