लॉकडाऊनमध्ये आमदाराची गाडी अडवून फाडले चलान, 'या' दबंग महिला IAS अधिकाऱ्याची बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 02:59 PM2020-04-17T14:59:06+5:302020-04-17T16:06:12+5:30
राजस्थान सरकारने मंगळवारी रात्री उशीरा चित्तौडगड उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या तेजस्वी राणा यांची बदली संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हेल्थ इन्शुरन्स एजन्सी पदावर केली.
जयपूर :राजस्थानातील चित्तौडगड येथील उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या आयएएस महिला अधिकाऱ्याची बदली हा चर्चेचा विषय ठरला आहे. या महिला आयएएस अधिकाऱ्याने लाॅकडाऊनचे उल्लंघन केलेल्या काँग्रेस आमदाराच्या कार्यकर्त्याच्या गाडीचे चलान फाडले होते. जेव्हा ही घटना घडली, तेव्हा आमदार स्वतः गाडीत होते. राजस्थान सरकारची ही कारवाई दुर्दैवी असल्याचे केंद्रीय मंत्री गजेन्द्र सिंह शेखावत यांनी म्हटले आहे. तर राजस्थान सरकार चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करत असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी म्हटले आहे. तेजस्वी राणा, असे संबंधित आयएएस अधिकारी महिलेचे नाव आहे.
शेखावत म्हणाले, राजस्थानात कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आमचे अधिकारी, प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, चित्तोडगड येथे लॉकडाऊनचे सक्तीने पालन करायला लावणाऱ्या कोरोना योद्धा महिला अधिकाऱ्याची राजकीय कारणांमुळे बदली करणे दुर्दैवी आहे. राजस्थान सरकार यामागचे काहीही कारण सांगो, मात्र संबंधित अधिकाऱ्याची बदली ही घटनेच्या दुसऱ्यात दिवशी झाली. यातून राज्य सरकारची मानसिकता स्पष्ट होते. यामुळे कोरोना व्हायसशी लढणाऱ्या इतर अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल खचू शकते.
प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले, सरकार चांगले काम करत असलेले अधिकारी आणि लोकांना निशाणा बनवत आहे. अशीच घटना जयपूरमध्येही झाली आहे. येथे राशनच्या दुकानावर काम करणाऱ्या सिव्हिल डिफेन्सच्या लोकांना बाजूला करून दुसऱ्या कडे ते काम देण्यात आले.
अशी घडली होती घटना -
राजस्थान सरकारने मंगळवारी रात्री उशीरा चित्तौडगड उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या तेजस्वी राणा यांची बदली संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हेल्थ इन्शुरन्स एजन्सी पदावर केली. यानंतर त्यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली आहे. कारण मंगळवारीच तेजस्वी राणा यांनी लॉकडाऊन काळात मुख्य बाजारातून जाणाऱ्या बेगूं येथील आमदार राजेन्द्र सिंह विधूडी यांच्या कार्यकर्त्याच्या गाडीचे चलान फाडले होते.
विधूडी हे कान सिंह भाटी या आपल्या कार्यकर्त्यासोबत त्याच्या गाडीतून चित्तौडगड किल्ल्यापासून सर्किट हाऊस कडे जात होते. या वेळी कान सिंहच गाडी चालवत होता. मात्र, जेव्हा एसडीएमने गाडी आडवून कान सिंहला लायसन्स मागीतले तेव्हा ते त्याच्या जवळ नव्हते. यामुळे राणा यांनी गाडीचे चलान फाडले. याच दिवशी राणा भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांवरही सोशल डिस्टंसिंगच्या मुद्द्यावरून भडकल्या होत्या. यानंतर जेव्हा व्यापाऱ्यांनी पास दाखवले, तेव्हा त्यांनी ते पास फाडले होते. या घटनेनंतरच तेजस्वी राणा यांची बदली करण्यात आली असल्याचेही बोलले जात आहे.
नोकरीवरून काढून टाकाल तर याद राखा! पंतप्रधान नरेंद्र मोदींची नजर आहे