भाजपा नेत्याला धडा शिकवणा-या महिला पोलिसाची बदली
By admin | Published: July 2, 2017 06:13 PM2017-07-02T18:13:13+5:302017-07-02T18:13:13+5:30
बुलंदशहरमध्ये भाजपाच्या मुजोर नेत्याला धडा शिकवणा-या महिला पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली
ऑनलाइन लोकमत
उत्तर प्रदेश, दि. 2 - बुलंदशहरमध्ये भाजपाच्या मुजोर नेत्याला धडा शिकवणा-या महिला पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. श्रेष्ठा ठाकूर असं त्या महिला पोलीस अधिका-याचं नाव असून, भाजपा नेत्याला त्या महिला अधिका-यांनी चांगलाच धडा शिकवला होता. या प्रकारानंतर काही आमदारांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. योगी आदित्यनाथांच्या भेटीनंतर लागलीच श्रेष्ठा ठाकूर यांची बदली करण्यात आली. श्रेष्ठा ठाकूर यांच्यासोबत आणखी काही पोलीस उपअधीक्षकांचीही बदली करण्यात आल्याचे समोर आले आहे.
श्रेष्ठा ठाकूर या बुलंदशहरमधल्या पोलीस स्टेशनमध्ये महिला अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी त्यांनी स्थानिक पंचायतीमधील भाजपाचे नेते प्रमोद लोधी यांना दंड ठोठावला होता. त्या कारणास्तव त्यांनी पोलिसांशी वाद घातला. वादाचं धक्काबुक्कीत रुपांतर झाल्यानंतर पोलिसांनी प्रमोद लोधी यांना अटक केली होती. लोधींना अटक केल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या परिसरात पोलिसांविरुद्ध घोषणा देण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी श्रेष्ठा ठाकूर आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलीस वाहन चालकांकडून लाच घेत असून, श्रेष्ठा ठाकूर भाजपाच्या कार्यकर्त्यांवर आकसानं कारवाई करत असल्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे भाजपाचे स्थानिक नेते श्रेष्ठा ठाकूर यांच्या बदलीसाठी दबाव आणत होते.
श्रेष्ठा ठाकूर यांची बदली झाल्यानंतर आता भाजपाचे कार्यकर्ते त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहेत. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओत श्रेष्ठा ठाकूर योगी आदित्यनाथ यांचे नाव वारंवार उच्चारताना दिसत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांची चौकशी करू नये, असे पत्र भाजपा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून आणावे, असे श्रेष्ठा ठाकूर म्हणाल्या होत्या. श्रेष्ठा ठाकूर यांची बदली उत्तर प्रदेशच्या बहराइच या भागात करण्यात आली आहे.