शाळेसाठी मुलांना प्रवासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:27 AM2018-01-06T01:27:59+5:302018-01-06T01:28:16+5:30
आपल्या मुलांना शाळेच्या वेळापत्रकाचा फारच ताण सहन करावा लागतो, असे अनेकांना वाटत असते. पण तामिळनाडूतील गुंडरी (जिल्हा इरोड, तमिळनाडू) परिसरात असलेल्या २६ लहान खेड्यांतील ३२ मुले रोज शाळेला जाण्यासाठी घरातून पहाटे पाच वाजता निघतात आणि शाळा सुटल्यावर घरी परतायला त्यांना रात्रीचे १0 वाजतात.
गुंडरी (इरोड) - आपल्या मुलांना शाळेच्या वेळापत्रकाचा फारच ताण सहन करावा लागतो, असे अनेकांना वाटत असते. पण तामिळनाडूतील गुंडरी (जिल्हा इरोड, तमिळनाडू) परिसरात असलेल्या २६ लहान खेड्यांतील ३२ मुले रोज शाळेला जाण्यासाठी घरातून पहाटे पाच वाजता निघतात आणि शाळा सुटल्यावर घरी परतायला त्यांना रात्रीचे १0 वाजतात. हे रोजचे त्यांचे वेळापत्रक आहे.
त्यांची शाळा १९ किमीवरील कदंबूर येथे असून एकमेव बस त्यासाठी असून ती पहाटे ५.३० वाजता गुंडरीत येते. त्याआधी त्यांना बस स्टँडवर पोहोचावे लागते. ही बस जर चुकली तर त्या दिवशी शाळेत उपस्थित राहण्यासाठी मुलांना सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पातून खडतर प्रवास करावा लागतो. रोजच्यारोज कराव्या लागणाºया या प्रवासाच्या शिक्षेची बातमी पहिल्यांदा प्रसिद्ध झाल्यावर कोणालाच ते खरेच वाटले नाही. आज तर असे होऊच शकत नाही ही सर्वांची पहिली प्रतिक्रिया होती. पण वस्तुस्थिती पाहण्यासाठी एका इंग्रजी दैनिकाचा बातमीदार छायाचित्रकारासह त्या खेड्यात गेला. ते दोघे त्या मुलांसोबत त्याच बसने शाळेला गेले व परतलेही. तेव्हा कुठे त्यांना या भागातील लोकांचे दैनंदिन जगणे किती कठीण आहे याची जाणीव झाली. (वृत्तसंस्था)
मिनी-व्हॅन सुरू करण्याचे आदेश
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री सेंगोतय्यन यांच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्यांनी शाळकरी मुलांची ने-आण करण्यासाठीच मिनी-व्हॅन सुरू करण्यास वाहतूक अधिकाºयांना सांगण्यात येईल, असे सांगितले.
गुंडरी आणि परिसरात ५ हजारांपेक्षा जास्त लोक २६ खेड्यांत राहतात. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय. रोमन कॅथॉलिकांनी १९१० मध्ये तेथे प्राथमिक शाळा सुरू केली. १९७५ मध्ये शाळेच्या प्राथमिक वर्गांसाठी अनुदान मिळू लागले. आता तेथे १०वीपर्यंत वर्ग असले, तरी माध्यमिक वर्गांसाठी सरकारचे अनुदान नाही. या ३२ विद्यार्थ्यांत १८ मुली आहेत.